गुजरातमध्ये विजय रूपाणी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता, आणखी एक मंत्री नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 10:04 AM2018-01-03T10:04:52+5:302018-01-03T10:05:34+5:30
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या समोरील अडचणी कमी होत नाहीत.
अहमदाबाद- गुजरातमध्ये भाजपाने सहाव्या वेळा सरकार स्थापन केलं असलं तरीही मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या समोरील अडचणी कमी होत नाहीत. हवं ते खातं न मिळाल्याने आधी उपमुख्यमंत्री नितीन पटेल नाराज झाले. नितीन पटेल यांची नाराजी अमित शहांच्या एका फोनने दूर झाली. त्यांना हवं ते खातं मिळालं. आता गुजरात सरकारमधील आणखी एक मंत्री नाराज झाले आहेत. विजय रूपाणी सरकारमधील मंत्री पुरुषोत्तम सोलंकी नाराज असल्याचं समजतं आहे. सध्या ते मत्स्य उद्योग मंत्री आहेत. मात्र आपल्याला चांगलं खातं हवं, अशी मागणी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्याकडे केली आहे. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी सोलंकी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची भेट घेतली.
पुरुषोत्तम सोलंकी पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तसंच ते कोळी समाजाचं प्रतिनिधीत्त्व करतात. नितीन पटेल यांना जर विचारून खातं दिले जाऊ शकतं तर मग मला माझ्या आवडीचं खाते का दिले जाऊ शकणार नाही? असा प्रश्न पुरूषोत्तम सोलंकी यांनी उपस्थित केला आहे. पुरूषोत्तम सोलंकी यांच्या नाराजीमुळे भाजपापुढे आता ही नाराजी कशी दूर करायची असा प्रश्न पडला आहे. पुरुषोत्तम सोलंकी यांनी केलेल्या चांगल्या खात्याची मागणी रूपाणी सरकारपुढच्या अडचणींमध्ये भर घालणारी ठरू शकते, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
याआधी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याकडून अर्थ, शहर विकास आणि पेट्रोकेमिकलसंबंधीचे खातं काढून घेतल्यामुळे नाराज झाले होते. मात्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या प्रकरणी मध्यस्थी केली आणि तुम्हाला हवं ते खाते देऊ असं आश्वासनही दिलं. अमित शहा यांनी केलेल्या फोननंतर काही तासातच नितीन पटेल यांना अर्थ खात्याची धुरा देण्यात आली.