अमेरिकेची आणखी शक्तिशाली सुपरकॅरिअर नौका युद्ध सरावासाठी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 10:54 PM2020-07-22T22:54:26+5:302020-07-22T22:54:33+5:30
दक्षिण चीन समुद्रात शक्तिप्रदर्शन करणार
नवी दिल्ली : अंदमानच्या समुद्रात भारतीय नौदलाच्या चार नौकांनी अमेरिकेची सुपरकॅरिअर नौका यूएसएसआर निमिट्झसोबत याच आठवड्यात दुहेरी युद्ध सराव केला असतानाच आता दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेसह, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान, असा चौरंगी युद्ध सराव होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यासाठी अमेरिकेची आणखी शक्तिशाली सुपरकॅरिअर नौका यूएसएसआर रोनाल्ड रेगन सराव ताफ्यात दाखलही झाली आहे.
सूत्रांनी सांगितले की, चीनकडून आपल्या सर्वच शेजारी देशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर हा युद्ध सराव हाती घेण्यात आला आहे. या सरावाच्या अधिकृत निवेदनात मात्र चीनचा उल्लेख खुबीने टाळण्यात आला आहे. चीनच्या दादागिरीच्या विरोधात अमेरिकेकडून आशिया आणि युरोपीय देशांसह ऑस्ट्रेलियाशी भागीदारी वाढविली जात आहे. हिंदी महासागर प्रदेशात भारत हा अमेरिकेचा प्रमुख भागीदार असून, प्रशांत विभागात जपान आणि ऑस्ट्रेलिया अमेरिकेसोबत असल्याचे दोन युद्ध सरावांमुळे दिसून येत आहे.
चीनच्या सर्व प्रकारच्या हालचालींवर अमेरिकेची तीक्ष्ण नजर असल्याचे अमेरिकी संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्या ताज्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे. एस्पर यांनी म्हटले की, मित्र आणि भागीदार यांच्या सार्वभौमत्वाला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकी सुपरकॅरिअर नौका दक्षिण चीन समुद्र आणि परिसरात आहेत. या आठवड्यातील दोन युद्ध सरावात सहभागी होणारे अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांची नौदले येत्या नोव्हेंबरमध्ये हिंदी महासागरात मोठा युद्ध सराव करणार आहेत. या युद्ध सरावासाठी ऑस्ट्रेलियाकडून लवकरच इतर तीन देशांना निमंत्रित केले जाणार आहे.
हिंद प्रशांत क्षेत्र खुले राहावे -एस्पर
1. एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, हा चौरंगी युद्ध सराव (स्क्वाड एक्झरसाईज) असेल. त्यात नेतृत्वस्थानी अमेरिका असेल. आम्ही हिंदी महासागरात भारतीय नौदलासोबत आणि दक्षिण चीन समुद्राजवळील फिलिपिन्स सागरात जपान आणि आॅस्ट्रेलिया यांच्यासोबत काम करीत आहोतच.
2. मार्क एस्पर यांनी सांगितले की, हिंदी महासागरातील युद्ध सरावातून अमेरिका आणि भारत यांची नौदलविषयक बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते. हिंद-प्रशांत क्षेत्र खुले असावे यासाठी दोन्ही देश सहकार्य करीत आहेत.