सपाच्या आणखी एका आमदाराचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 02:39 PM2017-08-04T14:39:43+5:302017-08-04T14:43:04+5:30
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर समाजवादी पक्षामध्ये आमदारांचं राजीनामा सत्र सुरू झालं आहे.
लखनऊ, दि. 4- उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर समाजवादी पक्षामध्ये आमदारांचं राजीनामा सत्र सुरू झालं आहे. नुकतंच सपाच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला होता. आता आणखी एका आमदाराने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मेरठच्या आमदार सरोजनी अग्रवाल यांनी पक्षाला राजीनामा देत भाजपची वाट धरली आहे. सरोजनी अग्रवाल या समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आजम खान यांच्या जवळच्या मानल्या जातात. रीटा बहुगुणा आणि महेंद्रसिंह हे दोघं सरोजिनी अग्रवाल यांना पक्षात घेऊन आले होते, असं बोललं जातं. यांच्याशिवाय सपाचे दोन आमदार भाजपामध्ये प्रवेश करू शकतात, अशी माहिती समोर येते आहे.
Samajwadi Party MLC Sarojini Agarwal resigns from the party & joins BJP. pic.twitter.com/cS7An6E2El
— ANI UP (@ANINewsUP) August 4, 2017
बिहार, गुजरातनंतर आता उत्तरप्रदेशमध्ये राजकारणात उलथापालथ सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. समाजवादी पक्षाच्या विधानपरिषेदतील तीन आणि मायावतींच्या विधानपरिषदेतील एका सदस्याने आमदारकीचा राजीनामा दिला आहे. समाजवादी पक्षातील बुक्कल नवाब, मधुकर जेटली, यशवंत सिंह या तिघांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर चार महिन्यांनी या घडामोडी घडत आहेत. राजीनामा दिल्यानंतर बुक्कल नवाबने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करुन भाजपामध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. मार्च महिन्यात उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला होता. 403 सदस्यांच्या उत्तरप्रदेश विधानसभेत भाजपाचे 300 पेक्षा जास्त आमदार निवडून आले.
माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याबरोबर काम करु शकत नाही. पक्ष एक लढाईचा आखाडा बनला आहे, असं बुक्कल नवाब यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितलं. या तीन राजीनाम्यांमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा विधिमंडळात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झालाह. आदित्यनाथ गोरखपूर येथून तर, मौर्य फुलपूरमधून लोकसभेचे खासदार आहेत.
बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांनी भाजपावर कडाडून टीका केली. भाजपाला सत्तेची भूक असून त्यापायी त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मणिपूर, गोवा, बिहार, गुजरात आणि आता उत्तरप्रदेशात जे घडले त्यावरुन भाजपापासून लोकशाहीला धोका असल्याचे सिद्ध होतं असं मायावती म्हणाल्या होत्या.