जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; पोलिसाची गोळ्या झाडून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 22:05 IST2023-10-31T22:03:35+5:302023-10-31T22:05:01+5:30
सध्या सुरक्षा दलांनी परिसर रिकामा करून शोध मोहीम राबवली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; पोलिसाची गोळ्या झाडून केली हत्या
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी एका पोलिसाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. गेल्या तीन दिवसांतील हा तिसरा हल्ला आहे. सध्या सुरक्षा दलांनी परिसर रिकामा करून शोध मोहीम राबवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हेड कॉन्स्टेबल मोहम्मद दार यांची हत्या केली. मोहम्मद दार यांना त्यांच्या घराजवळ गोळ्या घालण्यात आल्या. दार हे पीसीआरमध्ये तैनात होते. गोळीबारानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
#UPDATE | J&K Police personnel HC Gh Mohd Dar succumbed to his injuries. Area has been cordoned off. Search operation going on. pic.twitter.com/brYOr7gBGY
— ANI (@ANI) October 31, 2023
गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांचे मनोबल वाढले आहे. तीन दिवसांतील हा तिसरा हल्ला आहे. या हल्ल्यांमध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. रविवारी एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार झाला होता, सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सोमवारी पुलवामा जिल्ह्यात उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तो तिथे मजूर म्हणून काम करत होता.