नेस वाडियांविरोधात आणखी एक साक्ष
By admin | Published: July 5, 2014 04:37 AM2014-07-05T04:37:50+5:302014-07-05T04:37:50+5:30
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या व्यवस्थापक (सेवा) तारा शर्मा यांनी उद्योगपती नेस वाडियांविरोधात साक्ष दिल्याचे मरिन ड्राइव्ह पोलिसांनी सांगितले.
मुंबई : किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या व्यवस्थापक (सेवा) तारा शर्मा यांनी उद्योगपती नेस वाडियांविरोधात साक्ष दिल्याचे मरिन ड्राइव्ह पोलिसांनी सांगितले. नेस आणि अभिनेत्री प्रीती झिंटा यांच्यातील वादाच्या शर्मा या तटस्थ किंवा स्वतंत्र साक्षीदार असल्याने त्यांचा जबाब महत्त्वाचा ठरणार आहे.
३० मे रोजी पंजाब विरुद्ध चेन्नई सामन्यादरम्यान वानखेडेच्या गरवारे स्टेडियममध्ये प्रीती व नेस यांच्यात वाद झाला. चुकीच्या पद्धतीने तिकिटांचे वाटप केल्याबद्दल नेस माझ्यावरही भडकले; माझ्या अंगावर ओरडले, असे शर्मा यांनी आपल्या जबाबात नमूद केले. प्रीती-नेस यांच्यात स्टॅण्ड आणि मैदानातील वादाची उपस्थितांमध्ये बरीच चर्चा रंगली होती, असेही शर्मा यांनी सांगितल्याचे समजते.
प्रीतीने नेस यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार केली होती. नेस यांनी अपमानास्पद वागणूक दिली, शिवीगाळ केली, असा दावा प्रीतीने केला होता. अद्यापपर्यंत शर्मा यांच्यासह एकूण १२ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे सहा जणांनी प्रीतीची तक्रार खरी असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, नेस यांनी नऊ साक्षीदारांची नावे पोलिसांना दिली होती. त्यापैकी बहुतांश जणांना मरिन ड्राइव्ह पोलिसांनी संपर्क साधला आहे. या व्यक्तींनी जबाब नोंदविण्याची तयारी दर्शविली असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)