विमानातील अश्लील आणि किळसवाणा प्रकार थांबेना, आता प्रवाशानं एअर होस्टेसला म्हटलं, इथं ये आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 10:24 PM2023-01-07T22:24:08+5:302023-01-07T22:25:30+5:30
एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये महिला प्रवाशावर एका मद्यपी प्रवाशानं लघुशंका केल्याची घटना ताजी असतानाच आता GoFirst एअर लाइन्सच्या फ्लाइटमध्ये छेडछाडीचा प्रकार समोर आला आहे.
नवी दिल्ली-
एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये महिला प्रवाशावर एका मद्यपी प्रवाशानं लघुशंका केल्याची घटना ताजी असतानाच आता GoFirst एअर लाइन्सच्या फ्लाइटमध्ये छेडछाडीचा प्रकार समोर आला आहे. एका परदेशी प्रवाशाने फ्लाइटमधील महिला फ्लाइट अटेंडंटसोबत (एअर होस्टेस) गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. नवी दिल्लीहून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडला आहे. ही घटना ५ जानेवारीची असल्याची माहिती समोर आली आहे.
परदेशी प्रवाशाने महिला फ्लाइट अटेंडंटशी अश्लील शब्दात संवाद साधला आणि तिला आपल्यासोबत बसण्यास सांगितलं. छेडछाडीच्या प्रकाराची एअर होस्टेसनं तक्रार दिली आणि नवीन गोवा विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी संबंधित प्रवाशाला ताब्यात घेतलं. प्रवाशांचा या वागण्याची माहिती नियामक डीजीसीएलाही देण्यात आली आहे. सीआयएसएफच्या जवानांनी या परदेशी प्रवाशाला पकडलं आहे. हे प्रकरण नवीन विमानतळाच्या उद्घाटनाच्या दिवसाशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे.
विमानात गैरवर्तनाची सातत्यानं वेगवेगळी प्रकरणं
२६ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद प्रवाशानं वृद्ध महिलेवर लघवी केली होती. यावेळी कर्मचाऱ्यांनीही विशेष कारवाई केली नाही. याबाबत महिलेने तक्रारही दिली. तब्बल महिनाभरानंतर हे प्रकरण पुन्हा समोर आल्यानंतर पोलीस आणि डीजीसीएने कारवाईचा बडगा उगारला. शंकर मिश्रा असे या तरुणाचे नाव असून तो मुंबईचा रहिवासी असून तो परदेशी कंपनीत कामाला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर कंपनीने तरुणाला नोकरीवरून काढून टाकले आहे.
दुसरीकडे, आरोपी तरुणाला शनिवारी दिल्ली आणि बेंगळुरू पोलिसांनी संयुक्तपणे बेंगळुरू येथून अटक केली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात शंकर मिश्रा यांच्याकडून अद्याप कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही. शंकरच्या वडिलांनी एक व्हिडिओ शेअर करत आपला मुलगा असे कृत्य करू शकत नाही असा दावा केला आहे.