अन्सारींनी जिथं सुरक्षित वाटतं त्या देशात जावं,'संघा'ने घेतला समाचार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2017 07:39 PM2017-08-13T19:39:21+5:302017-08-13T19:41:37+5:30

देशातील मुस्लिमांमध्ये अस्वस्थतेची जाणीव आणि असुरक्षततेची भावना असल्याचं वक्तव्य माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी  पदावरून पायउतार होताना केलं होतं.

Ansari should go to the country where they feel safe, the Sangha took the news | अन्सारींनी जिथं सुरक्षित वाटतं त्या देशात जावं,'संघा'ने घेतला समाचार 

अन्सारींनी जिथं सुरक्षित वाटतं त्या देशात जावं,'संघा'ने घेतला समाचार 

Next

नवी दिल्ली, दि. 13 - देशातील मुस्लिमांमध्ये अस्वस्थतेची जाणीव आणि असुरक्षततेची भावना असल्याचं वक्तव्य माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी  पदावरून पायउतार होताना केलं होतं. या वक्तव्यावरून  राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) नेते इंद्रेश कुमार यांनी अन्सारींवर जोरदार टीका केली आहे. अन्सारींनी त्यांना जिथं सुरक्षित वाटतं, अशा एखाद्या देशात गेले पाहिजे असं कुमार म्हणाले. राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या वतीने आयोजित राखी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात इंद्रेश कुमार बोलत होते. 
 माजी उपराष्ट्रपतींचे वक्तव्य दुर्दैवी आहे. अन्सारी हे पूर्वी भारतीय होते पण आता ते जातीयवादी झाले आहेत, ते पूर्वी सर्वपक्षीय नेते होते. पण ते आता काँग्रेसवादी झाले आहेत. अन्सारींनी केलेले वक्तव्य मुसलमान समाजातही ऐकणारे कोणी नाही.  गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना नव्हती पण आता त्यांना असुरक्षित वाटतंय, अन्सारींनी त्यांना जिथं सुरक्षित वाटतं, अशा एखाद्या देशात गेले पाहिजे असं इंद्रेश कुमार म्हणाले. 
काय म्हणाले होते अन्सारी- 
'असहिष्णुतेचा मुद्दा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहका-यांसमोर उपस्थित केला आहे'. देशातील नागरिकांच्या राष्ट्रीयत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणं अत्यंत विचलित करणारं असल्याचंही ते बोलले आहेत. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपला कार्यकाळ संपत असतानाच असं वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 
आपल्याला वाटत असलेली चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलून दाखवली का असं विचारलं असता हमीद अन्सारी यांनी होकार दिला. 
हमीद अन्सारी पुढे बोलले की, तथाकथित गोरक्षकांचे हिंसक हल्ले, कथित घरवापसी, राष्ट्रवादाचा अतिरेकी, अंधश्रद्धेचा विरोध करणाऱ्यांची हत्या या घटना भारतीय मूल्यांना, संस्कृतीला मारक ठरत आहेत. आपल्याच नागरिकांसाठी कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्याची सरकारी अधिकाऱ्यांची क्षमताही वेगवेगळ्या स्तरावर कमी पडत आहे.
'देशाच्या मुस्लीम समाजामध्ये आज असुरक्षितता आणि भीतीची भावना आहे. देशाच्या विविध भागांमधून मला अशा अनेक घटना ऐकायला मिळाल्या आहेत. भारतीय समाज वर्षानुवर्ष विविधतावादी आहे. पण आता हे वातावरण धोक्यात आहे. नागरिकांच्या भारतीयत्वावर प्रश्न उपस्थित करण्याची प्रवृती अतिशय चिंताजनक आहे', असं अन्सारी बोलले आहेत.
देशातील मुस्लिमांच्या मनात शंकेचं वातावरण आहे, आणि ज्या प्रकारची वक्तव्यं त्यांच्याविरोधात येत आहेत त्यामुळे त्यांच्यात असुरक्षततेची भावना जागी होत आहे का ? असा प्रश्न विचारला असता हमीद अन्सारी यांनी सांगितलं की, 'देशातील वेगवेगळ्या भागांमधून जे ऐकायला मिळत आहे त्यावरुन तुमचा अंदाज योग्य आहे. मी बंगळुरुत ही गोष्ट ऐकली होती. देशातील अन्य भागांमध्येही ऐकलं आहे. उत्तर भारतात या गोष्टी जास्त प्रमाणात ऐकायला मिळतात. अस्वस्थतेची जाणीव आणि असुरक्षिततेची भावना मनात घर करत आहे'. 

Web Title: Ansari should go to the country where they feel safe, the Sangha took the news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.