‘भिम’ला ‘क्वेस्ट फॉर इक्विटी’ने उत्तर
By Admin | Published: April 15, 2017 01:26 AM2017-04-15T01:26:32+5:302017-04-15T01:26:32+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खराखुरा वारसदार कोण? यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. निवडणुकांमध्ये बाबासाहेबांच्या नावाने मते देणारी पेटी
- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खराखुरा वारसदार कोण? यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. निवडणुकांमध्ये बाबासाहेबांच्या नावाने मते देणारी पेटी हाती राखण्यासाठी दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने त्या वारशावर दावा करीत आहेत. कांशीराम यांच्यानंतर मायावती यांनी त्या वारशावर वर्चस्व निर्माण केले; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने त्यात तडा निर्माण केला. दलित मते ही वर्षानुवर्षे काँग्रेसकडेच होती. त्याला मायावती यांनी असाच तडाखा दिला होता.
मोदी हे सत्तारूढ होताच महात्मा गांधींपासून ते वल्लभभाई पटेल, मदनमोहन मालवीय आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारशावर भाजपाने दावा केला. काँग्रेसने नेहरू कुटुंबाशिवाय इतर कोणत्याही पुढाऱ्याला पुढे येऊ दिले नाही, असा आरोप काँग्रेसवर भाजपाने केला व येथूनच भाजपा व काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू झाला.
मोदी यांनी आंबेडकर यांच्या जयंती दिनी (शुक्रवारी) नागपूरला जाऊन आंबेडकरांना आदरांजली वाहिली व आंबेडकरांच्या अनुयायींना संदेशही दिला.
दीक्षा भूमीवर जाऊन बाबासाहेबांचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्नही केला. इकडे काँग्रेसमध्ये आम्हीच आंबेडकरांच्या वारशाचे अस्सल राखणदार आहोत हे कसे पटवून द्यावे याबद्दल अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिणामी, काँग्रेसने बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित संकेतस्थळ (वेबसाइट) सुरू केले. त्याचे नाव ‘क्वेस्ट फॉर इक्विटी’ असून, त्यात बाबासाहेबांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे चित्रण आहे आणि काँग्रेसने बाबासाहेबांना किती महत्त्व दिले हे दाखवण्याचा प्रयत्नही.
या संकेतस्थळावर चार भागांत ३०० दुर्मीळ छायाचित्रे आहेत. त्यातून बाबासाहेब आणि काँग्रेस नेत्यांतील संबंधांचे कथन होते. त्यावर ९७ दुर्मीळ दस्तावेजही उपलब्ध करण्यात आले आहेत.
एकीकडे मोदी यांनी सुरू केलेले ‘भिम अॅप’ तर त्याला उत्तर म्हणून काँग्रेसचे हे ‘संकेतस्थळ’. बाबासाहेबांचा खराखुरा वारसदार काँग्रेसच आहे व त्यांचा वारसा
पुढे नेण्याचे काम करीत आहे हे दलितांनी समजून घ्यावे असा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
आम्ही कधीही देखावा करीत नाही
- अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष के. राजू म्हणाले की, काँग्रेस बाबासाहेबांचे वारसदार आम्हीच आहोत याचा देखावा करीत नाही.
दलितांचे हक्क मिळण्यासाठी काँग्रेस लढत आहे व लढत
राहील. बाबासाहेबांच्या वारशावरून आता त्रिकोणी संघर्ष सुरू झाला आहे.
त्यात भाजपा आणि
बसपचा समावेश आहे. आता दलित काय
निर्णय घेतात याकडे तिन्ही पक्षांची नजर आहे.