खुलेआम कॉपी होणा-या प्रश्नांचा 'उत्तर' प्रदेश, बोर्ड परिक्षेसाठी 15 हजाराचं पॅकेज
By admin | Published: March 24, 2017 12:55 PM2017-03-24T12:55:57+5:302017-03-24T12:59:19+5:30
परिक्षेत कॉपी करायला मिळावी यासाठी विद्यार्थांनी कॉपी माफियांना पाच हजारापासून ते 15 हजारापर्यंत पैसे दिले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
मथुरा, दि. 24 - गतवर्षी बिहारमध्ये शाळेच्या खिडक्यांमधून उघडपणे कॉपी केली जात असल्याचा फोटो चर्चेत आला होता. त्यानंतर निकाल हाती आले तेव्हा बहुचर्चिच टॉपर स्कॅमचा खुलासा झाला होता. यामुळेच बिहारची मुलं हुशार असतात आणि चांगल्या गुणांनी पासही होत असतात असा टोला हाणला जात असला तरी उत्तर प्रदेशामधील परिस्थिती याहून काही वेगळी नाही. उत्तर प्रदेश बोर्डाच्या परिक्षेदरम्यान कॉपी माफिया सक्रिय आहेत. काही परीक्षा केंद्रांवर तर उघडपणे, बिनधास्त कॉपी केली जात असून शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे काढले जात आहेत. हे सर्व वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मथुरा जिल्ह्यातील फराह येथील श्यामलाल कॉलेजमध्ये परीक्षा केंद्राबाहेर काही बाईक्स उभ्या करण्यात आल्या होता. हा कॉपी बहाद्दूरांच्या प्लानचा भाग होता. प्रत्येक बाईकमध्ये 500 मीटर अंतर ठेवण्यात आलं होतं. जेणेकरुन जर तपासणी करण्यासाठी कोणी अधिकारी आले तर कॉपी करणारे आणि मदत करणारे दोघांनाही अलर्ट देणं सोप्प जावं. जर कोणी अधिकारी शाळेत जाणार असेल तर याची माहिती आधीच केंद्रावर पोहोचली असते. त्यामुळे जेव्हा तिथे अधिकारी पोहोचतात तेव्हा परिस्थिती सामान्य असते. त्यामुळे येथे काही कॉपीचा प्रकार चालू आहे याचा अंदाजही येणार नाही. बरं जर केंद्रात तुम्ही गेलात तर तुम्हाला साधं तुम्ही कोण आहात हा प्रश्नही विचारला जाणार नाही. पोलिसही तुमची खातरजमा न करता केंद्रावर फिरायला देतात.
गुरुवारी सकाळचे 7 वाजून 50 मिनिटं झाली होती. दहावीचे विद्यार्थी विज्ञान विषयाची परिक्षा देत होते. यावेळी त्या रुममध्ये एक शिक्षक उपस्थित होते. सर्व विद्यार्थी घोळका करुन बसले होते, आणि पेपर सोडवण्यात व्यस्त होते. यावेळी अचानक खिडकीतून एक आवाज येतो. ती व्यक्ती सांगते 'पहिला संपला आहे, आता दुसरा लिहायला सुरु करा'. कॉपी करण्यासाठी मदत करणारी ती व्यक्ती मोठ्या आवाजात उत्तर सांगत होती, जे ऐकून सर्वजण पेपर सोडवत होते.
राधा गोपाल कॉलेजमध्ये तर पालकच विद्यार्थ्यांच्या बाजूला बसून प्रश्नांची उत्तरे सोडवण्यास मदत करत होते. यावेळी शिक्षक केंद्रामध्ये डोळ्यावर पट्टी बांधून फे-या मारत होते. विद्यार्थी जोरजोरात एकमेकांशी बोलत उत्तरं सांगत होते. एका प्रश्नाचं उत्तरं लिहून झालं की दुस-याचं उत्तर सांगण्यास सुरुवात होत होती. धक्कादायक म्हणजे हे सर्व पोलीस आणि प्रशासनाच्या नाकावर टिच्चून होत होतं.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परिक्षेत कॉपी करायला मिळावी यासाठी विद्यार्थांनी कॉपी माफियांना पाच हजारापासून ते 15 हजारापर्यंत पैसे दिले आहेत. कॉपी माफियांनी तर यासाठी पाच हजारापासून ते 15 हजापर्यंतचं पॅकेजच तयार केलं आहे. पाच हजार रुपये त्या विद्यार्थ्यांसाठी जे स्वत: आणलेल्या कॉपीमधून नक्क्ल करणार. 10 हजार रुपये त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना बोलून उत्तरं सांगावी लागणार आहेत. सर्वात महागडं म्हणजे 15 हजाराचं पॅकेज त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना फक्त केंद्रावर हजेरी लावायची आहे. त्यांच्या जागी दुसरी व्यक्ती बसून परीक्षा देणार. ज्याला जसं शक्य आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी पॅकेज घेतलं आहे.
कॉलेज, शाळांमध्ये अशा प्रकारची गडबड चालू असल्याचं मान्य करताना अधिकारी मात्र याचा दोष शाळा, कॉलेज प्रशासनाला देत आहेत. पोलिस हा प्रकार रोखण्यासाठी पुर्ण प्रयत्न करत आहेत, मात्र ते नक्कलबाज कोणता ना कोणता तरी मार्ग शोधून काढतात असं त्यांचं म्हणणं आहे. मथुराचे एडीएम यांनी सांगितलं आहे की, 'आतापर्यंत 55 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडलं असून त्यांच्या कॉपीवर निशाण केलं आहे. त्यांच्या भविष्याच्या निर्णय शिक्षण मंडळ घेईल'.
मथुराचे जिल्हा शिक्षण अधिकारी इंद्रप्रकाश सिंह यांनी सांगितलं की, 'जिल्ह्यातील 25 शाळांना तुमच्या केंद्रावर नक्कल होत नाही हे लिखित देण्यास सांगण्यात आलं आहे. जर त्यांच्याविरोधात पुरावा मिळाला तर पाच वर्षांसाठी त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे'.