अंतरात्म्याचा आवाज ऐकून राजीनामा दिला- नितीश कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 07:45 PM2017-07-26T19:45:52+5:302017-07-26T20:52:03+5:30
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला आहे.
ऑनलाइन लोकमत
पटना, दि. 26 - बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी लालूप्रसाद यादवांसह विरोधकांवर निशाणा साधला आहे. नितीश कुमार म्हणाले, मी माझ्याकडून प्रयत्न करून थकलोय. मात्र तेजस्वी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचं राष्ट्रीय जनता दलानं स्पष्टीकरणं दिलं नाही. त्यामुळेच मी माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांनी बेनामी संपत्ती प्रकरणात लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही निशाणा साधला आहे. नितीश कुमार यांनी बिहारचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माझ्यासाठी सर्व रस्ते खुले आहेत. जेवढं शक्य झालं तेवढं आम्ही आघाडीच्या धर्माचं पालन करत काम करण्याचा प्रयत्न केला. बिहारमध्ये सामाजिक परिवर्तनाचा पाया रचला आहे. दारूबंदी केली आहे. तसेच सामाजिक हिताच्या योजना पुढेही सुरूच ठेवल्या आहेत. राजीनाम्याची माहिती लालूंना आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना दिली होती. तेजस्वीनं स्वतःला आधी निर्दोष सिद्ध करायला हवे होते. मी कोणावरही आरोप करत नाही. आम्ही कधी कोणाचा राजीनामा मागितला नाही. नोटाबंदीचं आम्ही समर्थन केलं आहे, नोटाबंदीला जनतेचं चांगलं समर्थन मिळालं आहे. मुख्यमंत्री म्हणून मी चांगलं काम करतोय. राज्याच्या विकासासाठी मला काम करताना अडचणी येत होत्या म्हणून राजीनामा दिल्याचंही नितीश कुमार म्हणाले आहेत.