अन्तर्मना आचार्य प्रसन्न सागरजी महाराज यांनी ५५७ दिवसांनंतर सोडला उपवास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 07:00 AM2023-01-29T07:00:23+5:302023-01-29T07:00:56+5:30
Antarmana Acharya Prasanna Sagarji Maharaj: अन्तर्मना आचार्य प्रसन्न सागरजी महाराज यांनी ५५७ दिवसांनंतर मधुबन स्थित पारसनाथ पर्वतावर महापारना केला. यावेळी संपूर्ण पारसनाथ पर्वत महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमून गेला.
- एस. पी. सिन्हा
गिरिडीह : अन्तर्मना आचार्य प्रसन्न सागरजी महाराज यांनी ५५७ दिवसांनंतर मधुबन स्थित पारसनाथ पर्वतावर महापारना केला. यावेळी संपूर्ण पारसनाथ पर्वत महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमून गेला. लहान मुले, वृद्ध, महिला महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आतुर झालेले दिसत होते. महाराजांनी गुंफेतून बाहेर येत सर्वांचे अभिनंदन केले, तर मंदिराच्या बाहेर शिडीवर उभे राहून महापारना केला. नंतर डोलीच्या माध्यमातून महाराजांनी खाली उतरायला सुरुवात केली. ठिकठिकाणी महाराजांवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. ढोल, नगारे वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले.
झारखंड दिगंबर जैन धार्मिक न्यास बोर्डाचे अध्यक्ष ताराचंद जैन यांनी सांगितले की, महापारना महोत्सवात लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, फिलिपिन्सच्या महाराणी इसाबेला, योगगुरू रामदेवबाबा, नेपाळचे संसद सदस्य प्रकाश मानसिंह यांच्यासह अनेक प्रसिद्ध लोक उपस्थित होते. तीर्थस्थळ शिखरजी येथे आयोजित प्रसन्न सागरजी महाराजांच्या महापारना महोत्सवात सहभागी होण्यासाठी हे मान्यवर आले होते.
गत ५५७ दिवसांपासून प्रसन्न सागरजी महाराज यांनी मौन व्रत धारण केले होते. त्यांनी हा उपवास सोडला. त्यानंतर आता महापारना हा कार्यक्रम सुरू झाला. २९ जानेवारीपासून पंचकल्याणक महोत्सव सुरू होईल. महापारना महोत्सव आकर्षक आणि धार्मिक बनविण्यासाठी जैन समाजाने पूर्ण तयारी केली आहे. ५५७ दिवसांचा उपवास व मौन साधनेत राहिलेल्या प्रसन्न सागरजी महाराजांना गुरू मानून लोक त्यांची पूजा करीत आहेत.