‘देशविरोधी कृत्ये’, १२ सरकारी कर्मचारी काश्मिरात बडतर्फ
By admin | Published: October 21, 2016 03:08 AM2016-10-21T03:08:39+5:302016-10-21T03:08:39+5:30
देशविरोधी कारवाया केल्याबद्दल जम्मू आणि काश्मीर सरकारने आपल्या १२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले कर्मचारी महसूल, सार्वजनिक आरोग्य
- सुरेश डुग्गर, श्रीनगर
देशविरोधी कारवाया केल्याबद्दल जम्मू आणि काश्मीर सरकारने आपल्या १२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले कर्मचारी महसूल, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, ग्रामविकास, शिक्षण आदी विभागांतील आहेत. राज्य सरकारने त्यांना बडतर्फ करण्यासाठी जम्मू-काश्मीर घटनेच्या कलम १२६ चा आधार घेतला. यापैकी काही कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यातहत अटक करण्यात आली होती, तर उर्वरित जामिनावर आहेत किंवा अटक टाळत आहेत.
राज्य पोलीस दलाच्या गुप्तवार्ता विभागाने वातावरण भडकावणे तसेच युवकांना हिंसाचारास चिथावल्याबद्दल ३६ सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध गेल्या महिन्यात अहवाल तयार केला होता. हा अहवाल पुढील कारवाईसाठी मुख्य सचिवांच्या कार्यालयात पाठविल्यानंतर बडतर्फीचे आदेश निघाले. आणखी काही कर्मचाऱ्यांची या अहवालाच्या आधारे चौकशी सुरू असून, त्यानंतर अन्य काही कर्मचाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरकारी कर्मचारी देशविरोधी कारवायांत गुंतल्याचे यापूर्वीही आढळले असून, त्यातील काहींना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. यापूर्वी १९९० मध्ये ५ जणांना राज्य सरकारने सेवेतून बडतर्फ केले होते. विद्यमान शिक्षणमंत्री नईम अख्तर यांचा त्यात समावेश होता.
काश्मिरात शांतता, वाहने मोठ्या संख्येने रस्त्यावर
काश्मीर खोऱ्यात प्रमुख रस्त्यांवरील वाहनांचे ये-जा वाढली असून, शहरातील सिव्हिल लाईन्स भागातील परिस्थिती सामान्य होत आहे. तथापि, खोऱ्यात फुटीरवाद्यांच्या बंदमुळे सलग १०४ व्या दिवशीही जनजीवन सुरळीत होऊ शकले नाही. फुटीरवाद्यांनी बंदची मुदत २७ आॅक्टोबरपर्यंत वाढविली आहे.
फुटीरवाद्यांच्या बंदचा आज १०४ वा दिवस आहे. मात्र, परिस्थिती सामान्य होत असल्याचे दिसून आले. खासगी कार, आॅटोरिक्षा आणि टॅक्सी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत. आता अधिकाधिक लोक फुटीरवाद्यांच्या बंदला महत्त्व न देता आपले दैनंदिन काम करीत आहेत.
अनेक ठिकाणी दुकानेही उघडू लागली असून, वाहतुकीची कोंडीही पाहावयास मिळत आहे. संपूर्ण काश्मीर खोऱ्यात कुठेही संचारबंदी नसून संवेदनशील ठिकाणी मोठ्या संख्येने सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.