विकासविरोधी दहशतवाद ही दोन्ही राष्ट्रांची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 07:02 AM2018-01-19T07:02:38+5:302018-01-19T07:03:06+5:30
दिल्ली आणि गुजरातनंतर मुंबईत दाखल झालेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी २६/११च्या मुंबई हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली
मुंबई : दिल्ली आणि गुजरातनंतर मुंबईत दाखल झालेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी २६/११च्या मुंबई हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर बिझनेस समीटमध्ये सहभागी होत दहशतवाद ही भारत आणि इस्रायल या दोन्ही राष्ट्रांची समस्या असल्याचे सांगितले. मात्र, आता परिस्थिती बदलली असून कोणत्याही दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी दोन्ही राष्ट्रे सज्ज असल्याचेही ते म्हणाले.
हॉटेल ताज येथे आयोजित ‘भारत-इस्रायल उद्योग संमेलन-२०१८’मध्ये बेंजामिन नेतान्याहू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही देशांतील उद्योजक उपस्थित होते. इस्रायलचे भारतातील राजदूत डॅनियल कारमॉन यांनी प्रास्ताविक केले. या वेळी नेतान्याहू म्हणाले की, भारत आणि इस्रायलची फार जुनी मैत्री असून दोन्ही देशांना उज्ज्वल भविष्य आहे. इस्रायलमध्ये चांगले संशोधक, तंत्रज्ञ आहेत. विकासाभिमुख वातावरण आहे. दोन्ही देशांच्या उद्योगवाढीसाठी चांगल्या संधी आहेत. आता एकत्र काम करून विकास साधायचा आहे.
गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ
बिझनेस लीडर असलेल्या महाराष्ट्रात इस्रायलच्या उद्योगपतींनी उद्योग सुरू करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात केले. इस्रायलने केलेल्या कृषी क्रांतीचे जगभर कौतुक होत आहे. भारताने वेळोवेळी इस्रायली कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून विकास साधला आहे. उत्पादनवाढीसाठी होत असलेले विविध संशोधन आणि प्रयोग याचा फायदा कृषी उद्योगाला होत आहे.महाराष्ट्रात उद्योगवाढीस पोषक वातावरण आहे. देशातील अन्य राज्यांपेक्षा सर्वांत मोठी ५० टक्के आर्थिक गुंतवणूक या राज्यात झाली आहे. इस्रायलच्या उद्योजकांसाठी गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ व संधी आहे. दहशतवादासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, दोन्ही राष्ट्रे दहशतवादाविरुद्ध लढत आहेत. आता एकत्रपणे लढून दहशतवाद मोडून काढायचा आहे.