भारतविरोधी घोषणा देणा-या मसरत आलमला अटक
By admin | Published: April 17, 2015 09:45 AM2015-04-17T09:45:53+5:302015-04-17T09:51:06+5:30
पाकिस्तानचा ध्वज फडकावत पाक समर्थनार्थ घोषणा देणारा जम्मू काश्मीरमधील फुटिरतावादी नेता मसरत आलमला अखेर जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे.
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १७ - पाकिस्तानचा ध्वज फडकावत पाक समर्थनार्थ घोषणा देणारा जम्मू काश्मीरमधील फुटिरतावादी नेता मसरत आलमला अखेर जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. हिंसाचारग्रस्त त्राल येथील सभेला जाण्यापूर्वी पोलिसांनी मसरतला अटक केली असून केंद्र सरकारनेही जम्मू काश्मीर सरकारच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.
पाच वर्षांनी हुर्रियत कॉन्फरन्सचे सय्यद अली शाह गिलानी यांनी बुधवारी जम्मू काश्मीरमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेत मसरत आलम या फुटिरतावादी नेत्यांनी भारतविरोधी घोषणा देत स्थानिक तरुणांना पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यासाठी उकसवले होते. या सभेनंतर जम्मू काश्मीरमधील वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्र सरकारने या सभेला मंजूरी दिलीच कशी असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारकडून अहवाल मागवला होता. केंद्र सरकारकडून दबाव वाढल्यानंतर जम्मू काश्मीर सरकारने अखेर मसरत आलमला अटक करण्याचे आदेश दिले.
त्रालमध्ये सैन्य व दहशतवाद्यांच्या चकमकीत स्थानिक तरुणाचा मृत्यू झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. शुक्रवारी सकाळी मसरत आलम त्राल येथे सभेसाठी जाणार होता. मात्र सभेला जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली. तर सय्यद अली शाह गिलानी यांनाही पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे.
मसरत हा गेली काही वर्ष तुरुंगातच होता. पण जम्मूत पीडीपी - भाजपा सरकार सत्तेवर येताच मसरतची तुरुंगातून सुटका करण्यात आली.