मोदी यांच्या विमानात क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा, पुढील आठवड्यात देशात होणार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 06:26 AM2020-08-22T06:26:15+5:302020-08-22T06:26:34+5:30
सेल्फ प्रोटेक्शन सुटस् (एसपीएस) ही अत्याधुनिक सुविधाही आहे.
नवी दिल्ली : क्षेपणास्त्र हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करण्याची यंत्रणा बसविलेले खास नवे विमान एअर इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वापरासाठी खरेदी केले असून, ते पुढील आठवड्यात दिल्ली विमानतळावर दाखल होईल, असे सूत्रांनी सांगितले.
बोर्इंग ७७७-३०० ईआरएस या प्रकारातील अशी दोन विमाने एअर इंडियाने खरेदी केली आहेत. त्यातील पहिले विमान पुढील आठवड्यात, तर दुसरे विमान या वर्षाच्या अखेरीस भारतात दाखल होईल. पंतप्रधान मोदी यांच्या वापरासाठी असलेल्या या विशेष विमानामध्ये क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा बसविण्यात आली असून, तिला लार्ज एअरक्राफ्ट इन्फ्रारेड काऊंटरमेजर्स (एलएआयआरसीएम), असे संबोधण्यात येते. त्याशिवाय सेल्फ प्रोटेक्शन सुटस् (एसपीएस) ही अत्याधुनिक सुविधाही आहे.
>सलग १७ तास
हवाई प्रवास शक्य
व्हीव्हीआयपी लोकांच्या दौऱ्यांसाठी सध्या वापरण्यात येणारे बोर्इंग ७४७ विमान पुन्हा इंधन भरल्याशिवाय सलग १० तासांपेक्षा जास्त काळ उड्डाण करू शकत नाही. त्यामुळे व्हीव्हीआयपींच्या प्रवासाचा वेळ वाढतो. मात्र, आता नव्या विशेष विमानाने सलग १७ तासांचा विमानप्रवास करणे शक्य होईल. कमी अंतराच्या प्रवासासाठी भारतीय हवाई दलातील कम्युनिकेशन स्क्वाड्रनच्या व्हीव्हीआयपी ताफ्यातल्या विमानाचा वापर केला जातो.