#ModiIsAMistake ! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीपूर्वी विरोधकांची पोस्टरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 11:02 AM2019-02-10T11:02:41+5:302019-02-10T11:56:17+5:30
लोकसभा निवडणूक 2019 चे मिशन डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन जनसभांना संबोधित करताना दिसत आहेत. उत्तर-पूर्व भागानंतर पंतप्रधान मोदी आता दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहेत.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक 2019 चे मिशन डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन जनसभांना संबोधित करताना दिसत आहेत. उत्तर-पूर्व भागानंतर पंतप्रधान मोदी आता दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी (10 फेब्रुवारी) पंतप्रधान मोदी आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे एनडीएमधून तेलुगू देसम पार्टी बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा आंध्र प्रदेशचा हा पहिलाच दौरा आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिणेकडील राजकीय वातावरण तापले आहे.
आंध्र प्रदेशातील कित्येक शहरांमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. काही पोस्टर्सवर थेट #NoMoreModi #ModiIsAMistake आणि Modi Never Again असे लिहिण्यात आले आहे. तर दुसऱ्या पोस्टरवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू पंतप्रधान मोदी आणि अन्य नेत्यांवर धनुष्य बाणाने निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान, नायडूंनी कार्यकर्त्यांना जाहिररित्या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा गांधीगिरी स्टाइलने विरोध करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे राज्यामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींच्या रॅलीला विरोध करण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील गुंटुर येथे एका रॅलीला संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी आपल्या कार्यकर्त्यांना शनिवारी(9 फेब्रुवारी) संपर्क साधून मोदींच्या दौऱ्याला गांधीगिरी स्टाइलने विरोध दर्शवण्यास सांगितले आहे. नायडू यांनी आपल्या पार्टीच्या नेत्यांसोबत संवाद साधताना म्हटले की, ''आपल्यासाठी हा काळा दिवस आहे. त्यांनी आंध्र प्रदेशसोबत कसा अन्याय केला आहे, हे पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी येथे आहेत. मोदी राज्य आणि संवैधानिक संस्थांना कमकुवत बनवत आहेत. राफेल प्रकरणात पीएमओनं हस्तक्षेप करणं हा देशाचा अपमान आहे, असे म्हणते नायडूंनी पिवळे आणि काळे टीशर्ट-फुग्यांसहीत शांततेत मोदींविरोधात निदर्शनं करण्याचे आवाहन केले आहे''.
दरम्यान, आंध्र प्रदेश राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारने नाकारल्यानंतर टीडीपीनं एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
(चंद्राबाबू नायडू यांना एनडीएची दारे बंद : शहा, यू-टर्न करणारे संधिसाधू मुख्यमंत्री)