नक्षलवादविरोधी मोहिमेला यश; 17 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, 9 जणांवर होते 24 लाखांचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 20:56 IST2025-03-13T20:55:50+5:302025-03-13T20:56:58+5:30
या वर्षी आतापर्यंत 65 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

नक्षलवादविरोधी मोहिमेला यश; 17 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, 9 जणांवर होते 24 लाखांचे बक्षीस
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचा खात्मा करण्याचा प्रण घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नक्षलवाद्यांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. तर, या कारवाईला घाबरुन अनेक नक्षलवादी आत्मसमर्पणदेखील करत आहेत. याच क्रमाने छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात गुरुवारी 17 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यापैकी 9 जणांवर 24 लाख रुपयांचे बक्षीस होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. यामध्ये एका जोडप्याचाही समावेश आहे. विजापूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव म्हणाले की, या नक्षलवाद्यांनी माओवाद्यांची पोकळ आणि अमानवी विचारसरणी, वरिष्ठ कार्यकर्त्यांकडून निष्पाप आदिवासींचे होणारे शोषण आणि सुरक्षा दलांच्या वाढत्या प्रभावाबद्दल निराशा व्यक्त केली.
'निया नेल्लानार' (तुमचे चांगले गाव) योजनेवर नक्षलवाद्यांचाही प्रभाव आहे, ज्या अंतर्गत सुरक्षा दल आणि प्रशासन मूलभूत सुविधा पुरविण्याचा आणि अंतर्गत भागात विकास कामे करण्याचा प्रयत्न करत आहेत. आत्मसमर्पण केलेले सर्व नक्षलवादी बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या गांगलूर एरिया कमिटीमध्ये विविध पदांवर सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले.
नक्षलवाद्यांवर लाखोंचे बक्षीस
माओवादी विभागीय समितीचा सदस्य दिनेश मोदियम (36) हा विजापूर जिल्ह्यातील 26 गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड होता आणि त्याच्यावर 8 लाख रुपयांचे बक्षीस होते. त्याची पत्नी ज्योती टाटी उर्फ काला मोडियम (32) आणि दुला करम (32), दोघेही क्षेत्र समिती सदस्य म्हणून सक्रिय होते आणि त्यांच्यावर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस होते. आत्मसमर्पण करणाऱ्या इतर सहा जणांवर प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस होते.
यावर्षी 65 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण
यादव पुढे म्हणाले की, या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणात जिल्हा राखीव रक्षक, बस्तर फायटर, स्पेशल टास्क फोर्स, सीआरपीएफ आणि त्याची एलिट युनिट कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ॲक्शन) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्वांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची मदत देण्यात आली असून, त्यांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या वर्षी आतापर्यंत राज्यातील बस्तर रेंजमधील विजापूर जिल्ह्यात 65 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. गेल्या वर्षी विजापूरसह सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर भागात 792 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते.