लोकसभेत पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी, पुलवामाच्या चकमकीतील शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 01:32 PM2018-01-02T13:32:37+5:302018-01-02T13:32:44+5:30
लोकसभेमध्ये पुलवामामधील चकमकीत शहीद झालेल्या पाच जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
नवी दिल्ली- लोकसभेमध्ये पुलवामामधील चकमकीत शहीद झालेल्या पाच जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभा सदस्यांनी काही वेळासाठी मौन धारण करून शहीदांना श्रद्धांजली वाहिली. लोकसभेमध्ये भाजपाच्या खासदारांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन लोकसभेत आल्यानंतर खासदारांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन संसद दणाणून सोडली.
मंगळवारी सकाळी संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी पुलवामामधील सीआरपीएफ कॅम्पवर झालेल्या दहशवादी हल्ल्याचा उल्लेख केला. क्रुर दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले, असं सुमित्रा महाजन यांनी म्हंटलं.
संसदेमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी झाल्यानंतर काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. एका शिराच्या बदल्यात दहा शिर आणण्याचं विधान करणारे नरेंद्र मोदी यावेळी गप्प का? असा सवाल उपस्थित केला. भाजपाने या विधानावर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.
यावर संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी उत्तर दिलं. गेल्या एक वर्षात 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. पुलवामामधील चकमकीत तीन दहशतवाद्यांना सुरक्षारक्षकांनी ठार केलं. या घटनेचं राजकारण करायला नको. गृहमंत्री राजनाथ सिंह संसदेत हजर असून ते यावर वक्तव्य करतील, असं अनंत कुमार यांनी म्हंटलं.