OTT प्लॅटफॉर्मवरही तंबाखूविरोधी सूचना दाखवावी लागणार, मंत्रालयाने नवीन नियम जारी केले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 03:20 PM2023-05-31T15:20:07+5:302023-05-31T15:22:17+5:30
३१ मे रोजी विश्व तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी सूचनांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. या अधिसूचनेनुसार, OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी चेतावणी संदेश प्रदर्शित करणे अनिवार्य आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून कठोर कारवाई केली जाईल.
आज जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी चेतावणी प्रदर्शित करणे बंधनकारक असेल. विशेष म्हणजे, चित्रपटगृहे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणार्या व्हिडिओमध्ये तसेच ऑडिओमध्ये तंबाखूविरोधी सूचना दाखवणे अगोदरच बंधनकारक आहे. किमान तीस सेकंद कालावधीची तंबाखू विरोधी आरोग्य चेतावणी चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रमांच्या सुरूवातीस आणि मध्यभागी दर्शविली जाते.
NCP चं आंदोलन अन् मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; एकनाथ शिंदे म्हणाले, गय करणार नाही
नवीन नियमानुसार, तंबाखू उत्पादने किंवा त्यांचा वापर दाखवणाऱ्या ऑनलाइन प्रकाशकांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि मध्यभागी किमान तीस सेकंद तंबाखूविरोधी आरोग्य जागरूकता दाखवावी. तसेच, OTT प्लॅटफॉर्मना तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रदर्शनाच्या कालावधीत किंवा कार्यक्रमात त्यांचा वापर करण्याच्या कालावधीत स्क्रीनच्या तळाशी तंबाखूविरोधी आरोग्य चेतावणी देखील एक स्थिर संदेश म्हणून दाखवावे लागणार आहेत.
तसेच, तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत किमान २० सेकंदांचा ऑडिओ-व्हिज्युअल डिस्क्लेमर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि मध्यभागी दाखवावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले. अधिसूचनेत असे म्हटले आहे, "तंबाखूविरोधी आरोग्य चेतावणी संदेश पांढर्या पार्श्वभूमीवर काळ्या मजकुरात 'तंबाखूमुळे कर्करोग होतो'अशी चेतावणी दर्शवेल जी सुवाच्य असेल." तंबाखूविरोधी आरोग्य चेतावणी संदेश आणि ऑडिओ- व्हिज्युअल अस्वीकरण ऑनलाइन तयार केलेल्या सामग्रीच्या भाषेत असले पाहिजे, असंही यात म्हटले आहे.