सर्पदंशावरील औषधाला अंनिसचा विरोध
By Admin | Published: October 30, 2016 10:46 PM2016-10-30T22:46:59+5:302016-10-30T22:46:59+5:30
राजेवाडी येथील प्र्रकार : राज्यभरातून आलेले नागरिक परतले रिकाम्या हाताने
र जेवाडी येथील प्र्रकार : राज्यभरातून आलेले नागरिक परतले रिकाम्या हातानेडिंभे : राजेवाडी (ता. आंबेगाव) येथे लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अमावस्येला दिल्या जाणार्या सर्पदंशावरील आयुर्वेदिक औषध वाटपावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतल्याने सर्पदंशावर मिळणार्या औषधाचे वाटप बंद करण्यात आले. घोडेगाव पोलिसांनी बजावलेल्या नोटिसीमुळे यंदा औषधाचे वाटप बंद केल्याने जिल्ासह बीड, उस्मानाबाद, नगर, नाशिक येथून आलेल्या लोकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. या औषधाच्या जोरावर आम्ही वर्षभर शेतीवाडीत, काट्याकुट्यात काम करताना निश्चिंत राहायचो, अशा प्रतिक्रिया येथे दूरदूरवरून आलेल्या लोकांकडून बोलून दाखविल्या. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील राजेवाडी गावरचे सखाराम उंडे गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अमावस्येच्या दिवशी जंगलातील एका विशिष्ट वनस्पतीपासून सर्पदंशावरील औषध तयार करतात. हे औषध घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने राज्यभरातून नागरिक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी येथील दत्तमंदिरात यायचे. हे आयुर्वेदिक औषध घेतल्यास वर्षभरात सर्पदंश झाल्यास रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाच्या अंगात प्रतिकारशक्ती तयार होते व त्या रुग्णाचे प्राण वाचते, असा समज असल्याने आजही जिल्ातील जुन्नर, आंबेगाव, खेड, तर बीड, उस्मानाबाद, नाशिक, फलटण, इगतपुरी, दौंड, संगमनेर, वडगाव मावळ, तळेगाव आदी ठिकाणांहून लोक हे औषध घेण्यासाठी आले होते. शेतकरीवर्ग, नोकरदार, मजूर, डॉक्टरही हे औषध घेण्यासाठी येत असल्याचे पाहावयास मिळत होते.महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा यांना प्रतिबंध घालण्यासाठी सन २०१३ रोजी झालेल्या कायद्यानुसार अशा प्रकारची औषधे देणे हा गुन्हा आहे. या कृत्यास पायबंद घालण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे औषध देण्याविषयी आक्षेप घेतला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्रीकांत तिडके यांनी याविषयी घोडेगाव पोलीस ठाण्याला तक्रार अर्ज दाखल केल्याने यावर्षी राजेवाडी येथे दिले जाणारे सर्पदंशावरील औषधाचे वाटप बंद करण्यात आले. २ दिवसांपूर्वी सखाराम उंडे यांना घोडेगांव पोलिस स्टेशनला बोलावून या बाबत कल्पना देण्यात आली होती. त्यानुसार आज राजेवाडी येथील औषधवाटप न करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोट : जंगलातील झाडपाल्यापासून हे औषध तयार करून माझ्याकडे येणार्या लोकांना गेल्या अनेक वर्षांपासून देत आहे. पूर्वापार काळापासून जेथे दवाखान्यांची जवळपास सोयी-सुविधा नाहीत अशा ठिकाणी आयुर्वेदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक असाध्य रोग आयुर्वेदिक औषधांपासून बरे झाले आहेत. या औषधासाठी मी कुणाकडून कोणत्याच प्रकारचा मोबदला घेत नाही. माझ्या गुरूकडून ही विद्या मला मिळाली आहे. पूर्वी परिसरातील ठराविक चार-दोन गावांतील लोकांनाच हे औषध मी देत असे. मात्र, अलिकडे हे औषध घेण्यासाठी अनेक लोक येऊ लागले. केवळ सामाजिक कार्याच्या भावनेतून आजपर्यंत मी हे औषध लोकांना देत आलो आहे. याबाबत राज्य शासनाने मला आदिवासी समाजसेवक हा पुरस्कार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. सखाराम उंडे, वैद्य--------- गेल्या ३-४ वर्षांपासून येथे औषध घेण्यासाठी येत आहे. मला नागीण झाली होती. ती या औषधामुळे बरी झाली. हे औषध खाल्ल्यास साप दिसला तरी तो जवळ येत नाही, असा माझा अनुभव आहे. बबुशा नाथा घोगरे, जुन्नर २) गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मी हे औषध घेण्यासाठी दरवर्षी येत आहे. साप जरी जवळ आला तरी तो चावा घेत नाही, असा माझा याविषयी अनुभव आहे. बबन बुके, आडगाव सुपे (खेड) ३) मी सर्पदंशावरील पेशंट घेऊन येथे आलो होतो. सर्पदंश झाल्याने पेशंटला रक्ताच्या उलट्या होत होत्या. हे औषध खाल्ल्यानंतर पेशंटचा जीव वाचला. चासकमान कान्हेवाडी (ता. खेड) येथून आलेले बाबूराव धोंडिबा निमसे. ---------------२०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भात झालेल्या कायद्यानुसार अंधश्रद्धेवर आधारित एखादी घटना किंवा कृती कोठेही घडत असल्यास त्याला निर्बंध घालण्याच्या सूचना आहेत. राजेवाडी येथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वर्षभरात साप चावल्यास विष चढत नाही. माणूस मरत नाही, असे सांगून औषध दिले जाते आणि पैसे गोळा केले जातात, असा आरोप करीत हा प्रकार थांबविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. असा कुठलाही प्रकार येथे करू नये, याबाबतची सूचना या कार्यक्रमाच्या आयोजकांना आम्ही दिल्या आहेत. तसेच असा प्रकार घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. - मारुती खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक, घोडेगाव-----------------ओळी- अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आक्षेपामुळे राजेवाडी (ता. आंबेगाव) येथील सर्पदंशावरील औषधाचे वाटप बंद केल्याने लोकांना औषधाविना परतावे लागले. (छायाचित्र : कांताराम भवारी)