चोकसीच्या प्रत्यार्पणाची अँटिग्वाला केली विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 04:01 AM2018-08-06T04:01:43+5:302018-08-06T04:01:57+5:30
पंजाब नॅशनल बँकेस १४ हजार कोटी रुपयांना चुना लावून परागंदा झालेल्या हिरे व्यापारी मेहुल चोकसी याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने अँटिग्वा व बर्ब्युडा सरकारकडे औपचारिक विनंती केली.
नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेस १४ हजार कोटी रुपयांना चुना लावून परागंदा झालेल्या हिरे व्यापारी मेहुल चोकसी याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने अँटिग्वा व बर्ब्युडा सरकारकडे औपचारिक विनंती केली. भारताचा अँटिग्वाशी प्रत्यार्पण करार झालेला आहे. ‘अंटरपोल’कडून ‘रेड कॉर्नर नोटीस’ मिळविल्यानंतर या प्रत्यार्पणाच्या मागणीस जोर येईल.
परराष्ट्र खात्याचे अतिरिक्त सचिव मनप्रीत सिंग यांनी चोकसीच्या प्रत्यार्पणासाठी विनंती करणारे पत्र अँटिग्वाचे परराष्ट्रमंत्री ई. पॉल चेट ग्रीन यांच्याकडे व्यक्तिश: सुपूर्र्द केले. आता भारताने औपचारिक विनंती केल्याने कायद्यानुसार करायच्या प्रक्रियेत भारताला सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन ग्रीन यांनी दिल्याचे समजते. अर्थात विजय मल्ल्या यांच्या लंडनमध्ये सुरु असलेल्या प्रकरणाचा अनुभव लक्षात घेता चोकसीचे प्रत्यार्पणही सहजशक्य व झटपट होईल, असे दिसत नाही. चोकसीनेही ही केस लढविण्याची तयारी केली असून बडा वकील नेमला आहे.