पत्नीच्या प्रचारार्थ होणारी सभा रद्द, अनुपम खेर गाडीतूनच परत फिरले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 05:12 PM2019-05-07T17:12:16+5:302019-05-07T17:15:40+5:30
चंदीगडच्या सेक्टर 28 सी येथे सोमवारी सायंकाळी 4 वाजता एक सार्वजनिक बैठक होणार होती.
हरयाणा - अभिनेता अनुपम खेर यांच्या दोन सभा भाजपाकडून रद्द करण्यात आल्या आहेत. चंदीगड येथे पत्नी किरण खेर यांच्या प्रचारार्थ अनुपम खेर यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या सभांच्याठिकाणी अपेक्षानुरूप नागरिकांची गर्दी न झाल्याने भाजपाने या सभाच रद्द केल्या. चंडीगड येथे सातव्या टप्प्यात 19 मे रोजी चंडीगड येथे मतदान होणार आहे. या मतदारसंघात सध्या किरण खेर भाजपाच्या विद्यमान खासदार आहेत.
चंदीगडच्या सेक्टर 28 सी येथे सोमवारी सायंकाळी 4 वाजता एक सार्वजनिक बैठक होणार होती. मात्र, ऐनवेळी ही बैठक रद्द करण्यात आली. मात्र, ही बैठक रद्द करण्यात आल्याची सूचना मीडिया किंवा भाजपाच्या नेत्यांना देण्यात आली नव्हती. मन्नू भसीन नावाच्या एका आयोजकाने याबाबत माहिती दिली. मन्नू यांना पक्षाच्या कार्यालयातून तंबू ठोकण्यासाठी साहित्य आणण्यास लावले होते. मात्र, ते साहित्य वेळेत आणू शकले नाही. पण, या बैठक सभेला गर्दी न झाल्याने ही सभाच रद्द करण्यात आली, असे द ट्रीब्यून या वेबपोर्टलने म्हटले आहे.
भाजपाला आणखी एका ठिकाणी अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. अभिनेता अनुपम खेर यांच्या 35 सी येथून एका सभेला संबोधित करण्यापूर्वीच निघून जावे लागले. सोमवारी सांयकाळी 5 वाजता हा कार्यक्रम नियोजित केला होता. या कार्यक्रमासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली नव्हती. तसेच, नागरिकांची गर्दीही नव्हती. त्यामुळे अनुपम खेर आपल्या गाडीतून न उतरताच, निघून गेले. त्यानंतर, सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. त्यावेळी, हीरा नेगी यांनी उपस्थित असलेल्या 50 जणांना संबोधित केले. या कार्यक्रमठिकाणी किमान 200 जणांची उपस्थिती असणे, अपेक्षित होते. मात्र, ऐनवेळी गर्दी न झाल्याने भाजपाच्या या कार्यक्रमांवर नामुष्कीची वेळ आली.