एफटीआयआयच्या चेअरमनपदी अनुपम खेर यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 02:48 PM2017-10-11T14:48:11+5:302017-10-11T17:06:05+5:30
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गजेंद्र चौहान यांच्या जागी अनुपम खेर यांची एफटीआयआयच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज केली. गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या चेअरमनपदावरील नियुक्ती वादग्रस्त ठरली होती.
अनुपम खेर यांनी चरित्र अभिनेते म्हणून बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ आपली छाप पाडली आहे. त्यांनी 500 हून अधिक चित्रपटांमधून काम केले असून, त्यापैकी कर्मा, चायना गेट, दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे, कुछ कुछ होता है असे चित्रपट विशेष गाजले होते. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी भारत सरकारने खेर यांना पद्मश्री (2004) आणि पद्मभूषण (2016) या पुरस्कारांनी गौरवले आहे. तसेच खेर यांनी याआधी सेंसॉर बोर्ड आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे चेअरमन म्हणून काम पाहिले होते.
Anupam Kher appointed as the chairman of The Film and Television Institute of India, replaces Gajendra Chauhan pic.twitter.com/3femKUgGTT
— ANI (@ANI) October 11, 2017
दरम्यान, एफटीआयआयचे माजी चेअरमन गजेंद्र चौहान यांनी अनुपम खेर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. "एफटीआयआयचे नवे चेअरमन म्हणून अनुपम खेर यांची नियुक्ती झाली आहे. ते चांगले काम करतील, अशी अपेक्षा आहे. मी त्यांना भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा देतो," असे गजेंद्र चौहान म्हणाले.
Anupam Kher has been appointed now as FTII Chairman, I hope he works well. My good wishes are with him: Gajendra Chauhan,Ex-FTII chairman pic.twitter.com/rXbcwrMqJg
— ANI (@ANI) October 11, 2017
अनुपम खेर यांच्याआधी एफटीआयआयच्या चेअरमनपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र सुरुवातीपासूनच त्यांची नियुक्ती वादग्रस्त ठरली होती. त्यांच्या नियुक्तीवरून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत तब्बल १३९ दिवसांचा संप पुकारला होता. मात्र विद्यार्थ्यांचा विरोध झुगारून सरकारने गजेंद्र चौहान यांना एफटीआयआयच्या चेअरमनदावर कायम ठेवले होते. मात्र त्यांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांना मुदतवाढ नाकारण्यात आली होती.
नियामक मंडळावरील नियुक्त्या या तीन वर्षांसाठी असतात. चौहान यांच्या अध्यक्षपदाची कारकीर्द ही ४ मार्च २०१४ पासून ग्राह्य धरण्यात आली. मात्र प्रत्यक्षात ९ जून २०१५ रोजी एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर संस्थेतील विद्यार्थ्यांनी गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून रणकंदन माजवित आंदोलनाचे शस्त्र उगारले. १२ जून रोजी सुरू झालेला हा संप देशातील सर्वांत लांबलेल्या संपांपैकी एक ठरला. चौहान यांनी संप संपुष्टात आल्यानंतर ७ जानेवारी २०१६ ला अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती.