"आम्ही खेळाडूंसोबत, पण नियमानुसार चौकशी होणार", कुस्तीपटूंच्या आंदोलनावर अनुराग ठाकूर यांचं भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 06:55 PM2023-05-31T18:55:34+5:302023-05-31T18:55:57+5:30
खेळाडू आणि खेळांचे नुकसान होईल, असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आवाहन अनुराग ठाकूर यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना केले.
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी भाष्य केले. नियमानुसार तपास केला जाईल. तपास पूर्ण होईपर्यंत खेळाडूंना प्रतीक्षा करावी लागेल. खेळाडूंना किमान सर्वोच्च न्यायालय, पोलीस, क्रीडा विभागावर विश्वास ठेवावा लागेल, असे अनुराग ठाकूर म्हणाले.
खेळाडूंनी काय प्रश्न उपस्थित केला आहे, याची निष्पक्ष चौकशी व्हावी. चौकशीनंतर कारवाई व्हावी. पोलीस तपास करत आहेत. त्यांनी तपास पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी, अशी आमचीही इच्छा आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले. तसेच, आगामी काळात महत्त्वाचे सामने होणार आहेत. आम्ही सर्व खेळाडूंसोबत आहोत. इतर खेळाडू आणि खेळांचे नुकसान होईल, असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आवाहन अनुराग ठाकूर यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना केले.
ब्रिजभूषण शरण सिंह आणि कुस्तीपटूंमधील वाद थांबण्याऐवजी वाढतच चालला आहे. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी आंदोलक एक महिन्याहून अधिक काळापासून करत आहेत. दुसरीकडे भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण हे याप्रकरणात स्वत:ला निर्दोष सांगत आहेत. आपल्यावरील आरोप सिद्ध झाल्यास फाशी घेईन, असे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ब्रिजभूषण म्हणाले की, "माझ्यावर एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वतःला फाशी देईन. आंदोलक कुस्तीपटूंकडे माझ्याविरुद्ध काही पुरावे असतील तर त्यांनी ते न्यायालयात सादर करावेत. मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे." विशेष म्हणजे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेवर कुस्तीपटू ठाम आहेत.
मंगळवारी साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटू त्यांच्या पदकांचे विसर्जन करण्यासाठी त्यांच्या समर्थकांसह हरिद्वार येथे पोहोचले होते. मात्र, शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी कुस्तीपटूंना वाटेत अडवून समज दिली. यानंतर कुस्तीपटूंनी आपले पदक नरेश टिकैत यांच्याकडे सुपूर्द केले. या सोबतच कुस्तीपटूंनी याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.