"बटण कोणतंही दाबा मत कमळालाच जाणार"

By admin | Published: April 1, 2017 12:02 PM2017-04-01T12:02:41+5:302017-04-01T12:27:57+5:30

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

"Anyone with the button will hit the ball" | "बटण कोणतंही दाबा मत कमळालाच जाणार"

"बटण कोणतंही दाबा मत कमळालाच जाणार"

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मध्य प्रदेशातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या तयारी दरम्यान डमी ईव्हीएममध्ये घोळ असल्याची घटना समोर आल्याची माहिती केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. 
 
"दिल्लीमध्ये अशा प्रकारे निवडणूक होणार नाही. आसाम आणि मध्य प्रदेशातील ईव्हीएम केवळ भाजपाला मतदान करत आहे. हा तांत्रिक बिघाड असू शकत नाही", असं ट्विट करत केजरीवाल यांनी ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपाला पुन्हा एकदा टार्गेट केले आहं. 
 
काय आहे नेमके प्रकरण?
आम आदमी पार्टीकडून ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंबंधी त्यांनी एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील अटेरमधील पोटनिवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी निवडणूक अधिकारी तेथे पोहोचले होते. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी सलीना सिंह यांनी जेव्हा डमी ईव्हीएमचे दोन वेगवेगळी बटणं दाबून पाहिली तेव्हा व्हीव्हीपीएटीमधून (Voter verified paper audit trail) कमळ निशाणचेच प्रिंट दिसलं. मशीनच्या तपासणीदरम्यान सुरुवातीला ईव्हीएमचे चार क्रमांकाचे बटण दाबण्यात आलं. तेव्हा व्हीव्हीपीएटीमधून आलेल्या पेपर प्रिंटमध्ये सत्यदेव पचौरी यांचे नाव आणि कमळचे निशाण छापून आले. 
 
जेव्हा दुसरं बटण दाबले त्यावेळी पुन्हा कमळ निशाण आणि सत्यदेव पचौरी यांचेच नाव व्हीव्हीपीएटीमधून आलेल्या प्रिंटमधून छापून आले. दरम्यान, या सर्व घडामोडीचं तेथे उपस्थित असलेल्या प्रसिद्धी माध्यमांना वृत्तांकन न करण्याची धमकी अधिका-यांनी दिली, अशी कथित माहितीही समोर आली. 
 
अधिकाऱ्याने माध्यमांना धमकावले 
प्रसिद्धी माध्यमांसमोरच जेव्हा ईव्हीएमचं गौंडबंगाल समोर आला त्यावेळी निवडणूक अधिकारी सलीना सिंह यांनी ही गडबड बाहेर जाऊ नये म्हणून हलक्या आवाजात मात्र धमकीच्या स्वरात बातमी छापली तर तुरुंगात पाठवेण असे म्हटले. 
त्यानंतर लहार येथील आमदार डॉ. गोविंद सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर इव्हीएममध्ये गडबड करुन निवडणुकीत विजय मिळवण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप केला. डॉ. गोविंद सिंह म्हणाले, "इव्हीएममध्ये घोटाळा करुन भाजप विजयी होऊ इच्छित आहे. निवडणूक अधिकारी सलीना सिंह यांनी पत्रकारांना धमकावले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पारदर्शक कारभाराची आपेक्षा नाही."
 
सलीना या प्रकरणावर म्हणाल्या, "मध्य प्रदेशात इव्हीएम सोबत प्रथमच व्हीव्हीपीएटी मशिनचा प्रयोग होत आहे. मतदार मतदानानंतर 7 सेकंदांपर्यंत आपण केलेले मतदान पाहू शकतील. निवडणूक पारदर्शक होणार आहे."
 
 
यावर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही ट्विट केलंय. "बटण कोणतंही दाबा, मत केवळ कमळ निशाणावरच जाणार. पेपर प्रिंटमध्ये काहीही येवो, पण प्रसिद्धी माध्यमांमध्ये काहीही छापून आलं नाही पाहिजे. नाहीतर पत्रकारांना पोलीस ठाण्यात बसवतील. लोकशाही समाप्त..."
 
यापूर्वी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनीही उत्तर प्रदेश निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करत पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली होती. 
 
 

Web Title: "Anyone with the button will hit the ball"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.