आज संसदेत काहीही होऊ शकले असते! डिंपल यादव, दानिश अलींची घुसखोरांवर तीव्र प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 01:56 PM2023-12-13T13:56:21+5:302023-12-13T13:57:07+5:30
एका तरुणाने लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने धावत जाण्याचा प्रयत्न केला होता. या तरुणांनी नारेबाजीही केली.
संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला २२ वर्षे झालेली असताना आज लोकसभेमध्ये दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या टेबलवर उड्या मारल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणांनी बुटातून स्मोक स्प्रे काढून तो संसदेत फवारला होता. आज संसदेत काहीही होऊ शकले असते, असा सूर अनेक खासदारांनी लावला आहे.
एका तरुणाने लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने धावत जाण्याचा प्रयत्न केला होता. या तरुणांनी नारेबाजीही केली. काही खासदारांनी या तरुणांना घेरून पकडले आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले. हा धूर विषारी देखील असू शकला असता, हे सुरक्षेचे गंभीर उल्लंघन असल्याच्या प्रतिक्रिया खासदारांनी दिल्या आहेत.
या घुसखोर तरुणांना म्हैसुरचे खासदार प्रतापसिंह यांच्यामार्फत संसदेत प्रवेशाचे पास मिळाले होते, असे समोर येत आहे. दुसरीकडे सपाच्या डिंपल यादव यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. संसदेत जे लोक येतात ते दर्शक असतील किंवा पत्रकार त्यांच्यासोबत ओळखपत्र नसते. सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे. ही सुरक्षेतील गंभीर चूक आहे. आज लोकसभेत काहीही होऊ शकत होते, असे यादव म्हणाल्या.
बसपाचे निलंबित खासदार दानिश अली यांनी संसदेत एकदम धूर येऊ लागला. दोघांना पकडले आणि काही वेळात धावपळ उडाली होती. ही खूप मोठी चूक आहे.
हुकुमशाही चालणार नाहीचे नारे...
या दोन तरुणांसोबत एक महिलादेखील होती. या महिलेने हुकुमशाही चालणार नाही, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. यातील एक तरुण महाराष्ट्राच्या लातुरमधील होता, असे समोर येत आहे.