“...तर भारतात रामराज्य स्थापन होईल, उलटसुलट बोलणाऱ्यांनी श्रीराम वाचावेत”: अपर्णा यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 01:11 PM2021-10-20T13:11:23+5:302021-10-20T13:12:20+5:30
मी सनातनी आहे, कुटुंबातील प्रत्येक मुलाने प्रभू श्रीरामासारखे व्हावे, अशी अपेक्षा अपर्णा यादव यांनी व्यक्त केली आहे.
लखनऊ: आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. यातच आता समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव (Aparna Yadav) महत्त्वाची विधाने केली आहे. मी सनातनी आहे, कुटुंबातील प्रत्येक मुलाने प्रभू श्रीरामासारखे व्हावे, अशी अपेक्षा अपर्णा यादव यांनी व्यक्त केली आहे.
एका मुलाखतीत बोलताना अपर्णा यादव यांनी अतिशय स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी कितीतरी पिढ्या बळी गेल्या. यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहेत. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी या ऐतिहासिक क्षणात सहभागी होऊन राम मंदिराच्या बांधकामासाठी समर्पण राशी दिली पाहिजे, असे अपर्णा यादव यांनी म्हटले आहे.
...तर भारतात राम राज्य स्थापन होईल
राम मंदिर हे राष्ट्र मंदिर म्हणून उदयास येत आहे. हे प्रत्येकाचे मंदिर आहे आणि प्रत्येकाने यात योगदान दिले पाहिजे. मला जे योग्य वाटते ते मी करते. राम नेहमीच माझे प्रेरणास्थान राहिले आहेत. मी जे काही केले आहे, ते मी माझ्या मर्जीने केले. यावर बोलणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला उत्तर देणार नाही. आमच्या कुटुंबातील मुले रामासारखी व्हावीत असे आम्हाला वाटते. जे लोक माझ्याबद्दल उलटसुलट बोलत आहेत, त्यांनी त्यांनी थोडेसे राम वाचले तर भारतात राम राज्य स्थापन होईल, असा टोलाही अपर्णा यादव यांनी बोलताना लगावला.
दरम्यान, पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत विधानसभा निवडणुका होतील, असे म्हटले जात आहे. सन २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४०३ जागांवर विजय मिळाला होता. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी करून ही निवडणूक लढवली होती. समाजवादी पक्षाला ४७ तर, काँग्रेसला ७ जागांवर समाधान मानावे लागले होते.