APJ Abdul Kalam : लोकांचे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या 'या' खास गोष्टी वाचून वाटतं जगणं असावं तर असं....
By अमित इंगोले | Published: October 15, 2020 12:45 PM2020-10-15T12:45:07+5:302020-10-15T12:58:05+5:30
भारताचे मिसाईल मॅन, लोकांचे राष्ट्रपती अशी अब्दुल कलाम यांची ओळख होती. त्यांना पद्म भूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
देशाचे अकरावे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती. डॉ. कलाम यांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. देशाचे 'मिसाईल मॅन' म्हणून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. त्यांच्या कामाची आगळी शैली आणि विचार करण्याची वेगळी पद्धत यांमुळे त्यांना लोकांचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जाते. 27 जुलै 2015मध्ये आयआयएम- शिलाँग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम यांचे निधन झाले. 'भारतरत्न' अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याबाबतच्या काही खास गोष्टी...
- अब्दुल कलाम यांचे पुर्ण नाव 'अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम' असे होते.
- भारताचे मिसाईल मॅन, लोकांचे राष्ट्रपती अशी अब्दुल कलाम यांची ओळख होती. त्यांना पद्म भूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- मद्रास तंत्रज्ञान संस्थेतून हवाई क्षेत्रातील एरोनॉटिकल इंजिनीयरींगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी डीआरडीओमध्ये (संरक्षण संशोधन विकास संस्था) काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतीय लष्करासाठी हेलिकॉप्टरचे डिझाईन तयार केले.
- कलाम यांना करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रसिद्ध अवकाश शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. 1963 साली कलाम यांनी नासा या जगातील अग्रगण्य अवकाश संशोधन संस्थेला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पीएसएलव्ही आणि एसएलव्ही-3 या प्रकल्पांवर काम सुरु केले. हे दोन्ही प्रोजेक्ट यशस्वी झाले.
- एकदा 400 विद्यार्थ्यांसमोर बोलत असताना अचानक लाईट गेले. मात्र आपल्या चर्चेत, भाषणात कुठेही बाधा न येऊ देता डॉ. कलाम संपूर्ण विद्यार्थ्यांच्यामधून रांगेत फिरले आणि आपली चर्चा कायम ठेवली.
- भारताचे तात्कालिक पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात देशाने पोखरण येथे दुसरी अणूस्फोटाची चाचणी केली. या चाचणीत कलाम यांनी महत्वाची भूमिका बजावली. या चाचणीनंतर देशातील आघाडीचे अणवस्त्र शास्त्रज्ञ म्हणून लोक त्यांना ओळखू लागले.
- 1992 ते 1999 या कालावधीत अब्दुल कलाम देशाच्या पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार होते. पोखरण अणू चाचणीच्यावेळी राजकीय आणि तांत्रिक दोन्ही आघाड्यांवर त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
- जेव्हा डॉ. कलाम यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी निवडलं गेलं. तेव्हा शपथविधी कार्यक्रमाला त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत विमान प्रवासाचे तिकीट उपलब्ध होते. पण डॉ. कलाम हे असे व्यक्ती होते, ज्यांनी आपल्या पदाचा कोणत्याही वैयक्तिक कामासाठी वापर केला नाही. त्यांनी आपल्या नातेवाईकांना सेंकड एसी रेल्वेनं दिल्लीला शपथविधीसाठी आणलं.
- भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २००२ मध्ये त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले. 25 जून रोजी त्यांनी देशाचे 11 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
- राष्ट्रपती भवनातील सर्व दिवे सौरऊर्जेवर चालवण्यासाठी कलाम यांनी आराखडा तयार केला होता. पण या योजनेवर अंमलबजावणी करण्यापूर्वीच त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. सौरऊर्जे शिवाय भारताने आपली ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणूऊर्जा आणि बायोफ्युल तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा असे त्यांचे मत होते.
- अग्नी आणि पृथ्वी या दोन क्षेपणास्त्र निर्मितीच्या तंत्रज्ञानामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते.
- एकदा एका दीक्षांत समारंभात राष्ट्रपती डॉ. कलाम यांची खूर्ची इतर खूर्च्यांपेक्षा वेगळी आणि मोठी होती. त्यामुळं त्यांनी त्या खूर्चीवर बसण्यास नकार देत, साध्या खूर्चीवर ते बसले होते.
- अब्दुल कलाम यांना लहान मुले फार आवडत असतं. ही लहान मुलंच उद्याचं आपलं भविष्य आहे. त्यामुळे ते जास्तीत जास्तवेळ मुलांसोबत घालवायचे. त्यांच्या कुतूहलपूर्ण प्रश्नांची उत्तरे द्यायचे.