APJ Abdul Kalam’s Death Anniversary: देशातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलामांची संपत्ती किती होती माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 11:11 AM2019-07-27T11:11:42+5:302019-07-27T12:20:06+5:30
भारताचे अकरावे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आजही आपल्या प्रेरणादायी विचारांसाठी ओळखले जातात.
भारताचे अकरावे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आजही आपल्या प्रेरणादायी विचारांसाठी ओळखले जातात. जर असं म्हटलं की, कलामांची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे भारतीयांच्या त्या पिढ्या आहेत ज्यांना त्यांनी स्वप्न पहाण्यासोबतच ती सत्यात उतरवून पुढे जाण्यास शिकवलं, तर वावगं ठरणार नाही. अनेकदा कलामांच्या संपत्तीवरून चर्चा केल्या जातात. परंतु तुम्हाला माहीत आहे खरंच कलामांकडे किती संपत्ती होती?
आपलं संपूर्ण आयुष्य साधेपणाने घालवलेल्या कलामांची संपत्ती काहीच नव्हती. त्यांच्या संपत्तीमध्ये कोणतीही अशी एकही गोष्ट नव्हती ज्यावरून वाद होऊ शकेल. जर त्यांच्या सामानाबाबत बोलायचे झालेच तर फ्रिज, टीव्ही, गाडी आणि एसीही त्यांच्याकडे नव्हता. कलामांकडे त्याच्या संपत्तीच्या रूपामध्ये 2500 पुस्तकं, एक घड्याळ, 6 शर्ट, चार पॅन्ट आणि एक बुटांचा जोड होता.
कलामांना ऐशोआरामात जगणं कधीही मान्य नव्हतं. ते आपल्या पुस्तकांचं वैभव आणि आपल्या पेन्शनच्या आधारावर जीवन जगत होते. त्यांनी स्वतः त्यांच्या जीवनामध्ये चार पुस्तकं लिहिली. कलामांनी आयुष्यात केलेल्या त्यांच्या जमापुंजीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी कोणतीही वैयक्तिक भेटवस्तू स्वतःसोबत घेतली नाही. त्यांनी सर्व भेटवस्तू सरकारी खजिन्यामध्ये जमा केल्या होत्या.
कलामांचे मीडिया अॅडवायझर एसएम खान यांनी सांगितले की, 'त्यांच्या क्वार्टरमध्ये साधा टीव्हीसुद्धा नव्हता. ते फक्त रेडिओ आणि वर्तमानपत्रातून बातम्या जाणून घेत असतं.'
'भारतरत्न' कलाम सरांना सलाम!#APJAbdulKalamhttps://t.co/OTzHHT7LQN
— Lokmat (@MiLOKMAT) July 27, 2019
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अवुल पकिर जैनुल्लाब्दीन अब्दुल कलाम असे आहे. 27 जुलै 2015मध्ये शिलाँग मधील आयआयएम- शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम स्टेजवर कोसळले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने जाणून घेऊयात त्यांचे काही प्रेरणादायी विचार. जे तुमच्यातील नकारात्म विचारांना बाहेर काढून तुमच्यातील सकारात्मक विचारांना प्रेरणा देतील...
1. पावसात इतर पक्षी आपल्या संरक्षणासाठी आसरा शोधत असतात. पण गरूड मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्याही वरती जावून उडत असतो. आपली समस्या एकच असते, फक्त दृष्टीकोन वेगळा असतो. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम
2. काळा रंग अशुभ समजला जातो. पण काळ्या रंगाचाच फळा अनेक विद्यार्थांचे भविष्य उज्वल करतो. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम
3. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधं आहेत. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम
4. आयुष्यात येणाऱ्या कठिण परिस्थिती ह्या तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात, त्या तुम्हाला तुमच्यामधील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठिण परिस्थितींना देखील कळू द्या कि तुम्ही देखील खूप कणखर आहात. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम
5. यशस्वी लोकांच्या किंवा त्यांच्या यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन कल्पना मिळतील. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम
6. आपल्या यशाची व्याख्या भक्कम असेल तर आपण नेहमीच अपयशाच्या दोन पावलं पुढे असू. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम
7. झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं नसून स्वप्नं ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपूच देत नाही. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम
8. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचं भविष्य बदलतील. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम
9. आकाशा कडे बघा आपण एकटे अजिबात नाही. संपूर्ण ब्रम्हांड तुमचा मित्र आहे. पण ते भरभरून त्यालाच देतं जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम
10. तुमच्या सहभागाशिवाय तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही. आणि तुमच्या सहभागासोबत तुम्ही कधीही अपयशी होणार नाही. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम
11. तुमच्या पहिल्या यशानंतर अजिबात थांबू नका कारण जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर पहिले यश हे फक्त नशिबामुळे मिळाले हे बोलायला लोक तयारच असतात. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम
12. शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम