‘वन नाइट स्टँड’ला बाकायदा माफी!
By admin | Published: October 8, 2015 03:48 AM2015-10-08T03:48:42+5:302015-10-08T03:48:42+5:30
कनिष्ठ न्यायालयाने व्यभिचाराची (अडल्टरी) केलेली व्याख्या गुजरात उच्च न्यायालयाने योग्य ठरवत एका महिलेला विवाहबाह्य शरीरसंबंधांमुळे पोटगी नाकारण्याच्या
अहमदाबाद : कनिष्ठ न्यायालयाने व्यभिचाराची (अडल्टरी) केलेली व्याख्या गुजरात उच्च न्यायालयाने योग्य ठरवत एका महिलेला विवाहबाह्य शरीरसंबंधांमुळे पोटगी नाकारण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. कोणताही विशिष्ट उद्देश न ठेवता तरुण व्यक्तीकडून अजाणतेपणी एक किंवा दोन वेळा शरीरसंबंध ठेवले जात असेल तर त्या वर्तनाला व्यभिचार म्हणता येणार नाही, परंतु पती-पत्नीपैकी कुणीही सुनियोजितरीत्या विवाहबाह्य शरीरसंबंध ठेवत असतील तर त्याला व्यभिचार म्हणता येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. जाणीवपूर्ण विवाहबाह्य शरीरसंबंध ठेवत असल्याची कबुली देणाऱ्या एका महिलेला पोटगी नाकारताना न्यायालयाने व्यभिचार म्हणजे काय? तेही नमूद केले. सदर महिलेचे तिसऱ्या व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध असल्याचे पाहता ती पोटगीसाठी पात्र ठरूशकत नाही, मात्र तिच्या पतीने अल्पवयीन मुलाला निर्वाहभत्ता द्यावा, असे उच्च न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. पाटण जिल्ह्यातील एका महिलेने दंडाधिकारी न्यायालयात सीआरपीसी कलम १२५ नुसार पोटगीसाठी दावा केला होता. त्यानंतर तिने सत्र न्यायालयातही दाद मागितली असता विवाहबाह्य संबंधाचे कारण देत तिला पोटगी नाकारली गेली होती. (वृत्तसंस्था)
‘वन नाइट स्टँड’ला माफी सदर महिलेने तिसऱ्या व्यक्तीशी सातत्यपूर्ण शरीरसंबंध ठेवल्याचे पाहता तिला माफ करता येणार नाही. वैवाहिक आयुष्यात एखाद्यावेळी अजाणतेपणी चूक घडली असल्यास त्याला ‘वन नाइट स्टँड’ मानून माफ केले जाऊ शकते. या महिलेने गरोदर असतानाही परपुरुषाशी जाणीवपूर्वक स्वेच्छेने शरीरसंबंध ठेवले आहेत. त्याला व्यभिचारच म्हणावे लागेल, असे न्यायाधीशांनी पोटगी नाकारण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरविताना म्हटले.