अमिताभ संपविणार रेल्वे अनारक्षित तिकिटांच्या रांगा, तिकीट खरेदीसाठी अॅप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 03:56 AM2018-11-09T03:56:45+5:302018-11-09T04:07:33+5:30
अमिताभ बच्चन यांचा ‘कालिया’हा गाजलेला चित्रपट आहे. यात बिग बींचा एक सदाबहार डायलॉग आहे. ‘हम जहा खडे होते है,वहीसे लाईन शुरु होती है’. लवकरच रेल्वेत सुद्धा हा डायलॉग ऐकायला मिळणार
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली - अमिताभ बच्चन यांचा ‘कालिया’हा गाजलेला चित्रपट आहे. यात बिग बींचा एक सदाबहार डायलॉग आहे. ‘हम जहा खडे होते है,वहीसे लाईन शुरु होती है’. लवकरच रेल्वेत सुद्धा हा डायलॉग ऐकायला मिळणार असून लोकांना बच्चनप्रमाणेच रांगेत उभे न राहता अनारक्षित-यूटीएस तिकीट खरेदीचे आवाहन करण्यात येईल.
रेल्वे स्थानकांवरील अनारक्षित तिकिटांसाठीच्या रांगा संपविण्यासाठी रेल्वेकडून अशाप्रकारचे इतरही काही संवाद आणि व्हिडिओ जारी केले जाणार आहेत. रेल्वेने यूटीएस अथवा अनारक्षित तिकीट देशभरात अॅपच्या माध्यमाने देणे सुरू केले आहे. आणि नोव्हेंबरपासून इंटरझोन अनारक्षित तिकीट अॅपद्वारे उपलब्ध करून देणे सुरू केल्यापासून दर दिवसाला जवळपास ८० हजार तिकिटांची विक्री अॅपद्वारे होते आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत सुमारे दीड लाखावर तिकिटे यूटीएस अॅपने विकल्या जातील,अशी अपेक्षा आहे. यामुळे स्थानकांवर तिकीट खिडक्यांपुढील रांगा कमी करण्यास निश्चितच मदत मिळेल.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या आदेशानुसार लोकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या या अॅपवर प्रारंभी केवळ एका झोनमध्येच प्रवासाचे तिकीट दिले जात होते. परंतु १ नोव्हेंबरपासून यावर इंटरझोन अनारक्षित तिकीटही मिळत आहे. कोणत्याही रेल्वे स्टेशनच्या पाच किमी अंतरापर्यंत या अॅपवर तिकीट खरेदी केले जाऊ शकते. ग्रामीण, शहर,गाव,खेड्याच्या प्रत्येक स्टेशनवर ते कार्यरत आहे.
अमिताभ आणि इतर सिनेकलावंत, नामांकित लोक संदेशाद्वारे यूटीएसचा लाभ सांगतील तेव्हा लोक तासन्तास रांगेत उभे राहण्याऐवजी आपल्या मोबाईलवर अॅपच्या माध्यमाने अनारक्षित तिकीट खरेदीस प्राधान्य देतील,अशी आशा रेल्वेला आहे. यासोबतच लोकांना एका क्लिकवर तिकीट देण्याचे गोयल यांचे उद्दिष्टही साध्य होईल. लोक अॅपवर तिकीट खरेदी करून थेट गाडीत बसू शकतील.
सर्वाधिक खरेदी मुंबईत
एका अधिकाऱ्याने सांगितले की, अॅपवरील तिकिटाचे प्रिंटही काढण्याची सुविधा आहे. प्रवास केला नाहीतर हे तिकीट रद्दही केले जाऊ शकते. संपूर्ण किराया प्रवाशांच्या अकाऊंटमध्ये परत जाईल. मुंबईस्थित मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे क्षेत्रात अॅपद्वारे तिकीट खरेदी करणाºयांच्या सर्वाधिक संख्या आहे. तिसºया आणि चौथ्या क्रमांकावर कोलकात्यातील ईस्टर्न रेल्वे आणि चेन्नईचे दक्षिण रेल्वे आहे. तर साऊथ सेंट्रल रेल्वे पाचव्या क्रमांकावर आहे. या अॅपद्वारे दररोज ८० हजार तिकिटे विकल्या जात असून याद्वारे रेल्वेला ४५ लाख रुपयांवर उत्पन्न मिळत आहे. जवळपास साडेचार लाख प्रवासी या तिकिटांवर प्रवास करीत आहेत.