मोदींविरुद्धची याचिका हायकोर्टात दाखल
By admin | Published: September 28, 2015 11:43 PM2015-09-28T23:43:00+5:302015-09-28T23:43:00+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई केली जावी
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई केली जावी, अशी मागणी करणारी एक याचिका गुजरात उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे.
आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते निशांत वर्मा यांनी ही याचिका केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. अहमदाबादच्या रानिप भागातील एका मतदान केंद्रात मतदान करून बाहेर आल्यानंतर मोदी यांनी ‘कमळ’ हे भारतीय जनता पार्टीचे निवडणूक चिन्ह हातात घेऊन आपल्या मोबाईलवर एक सेल्फी छायाचित्र काढले होते. मतदान केंद्राबाहेर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली होती.
मोदींची ही कृती त्यावेळी सर्व वृत्तवाहिन्यांनी ‘लाईव्ह’ प्रक्षेपित केली होती. मतदान केंद्राच्या ५००मीटर परिसरात राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह प्रदर्शित करणे हा आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत गुजरात पोलिसांना यासंदर्भात ‘एफआयआर’ नोंदविण्याचा आदेश दिला होता.
त्यानुसार पोलिसांनी त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या मोदींविरुद्ध ‘एफआयआर’ नोंदविला. मात्र नंतर पोलिसांनी तक्रारीत तथ्य नसल्याचा ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर केला. तो मान्य करून दंडाधिकाऱ्यांनी प्रकरण बंद केले. वर्मा यांनी दंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात पुनरिक्षण याचिका केली आहे. मोदींनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचे व्हिडिओ चित्रीकरणात स्पष्ट दिसते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांची याचिका सविस्तर तपासून पाहण्याची गरज आहे, असे नमूद करून उच्च न्यायालयाने ती सुनावणीसाठी दाखल करून घेतली. (वृत्तसंस्था)