बुरहानच्या वडिलांचे शांततेसाठी आवाहन
By admin | Published: July 8, 2017 03:08 PM2017-07-08T15:08:01+5:302017-07-08T15:08:01+5:30
आपल्याला काश्मीर खोऱ्यामध्ये शांतता आणि सौहार्दाचे वातावरण हवे असल्याचे मत बुरहानच्या वडिलांनी मांडले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 8- बुरहान वानीला भारतीय सुरक्षा दलांनी ठार मारल्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात विविध ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बुरहानचे वडील मुजफ्फर अहमद वानी यांनी शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारची हत्या किंवा दुर्घटना होऊ नये असे सांगत आपल्याला काश्मीर खोऱ्यामध्ये शांतता आणि सौहार्दाचे वातावरण हवे असल्याचे मत मांडले आहे.
बुरहान वानीला कंठस्नान घातल्याच्या दिवसाला एक वर्ष पुर्ण होण्याचा हा दिवस जवळ येऊ लागला तसे फुटीरतावाद्यांचे विविध कार्यक्रम समोर येऊ लागले होते. इंग्लंडमध्येही बर्मिंगहॅम शहरात बुरहान वानीच्या नावाने मोर्चा आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र भारत सरकारच्या उप उच्चायुक्तांनी तक्रार करुन दहशतवाद्याला मानवी हक्काच्या नावाखाली मोठे होण्याची संधी देऊ नका असे मत तेथे मांडले. त्यानंतर या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. त्याचबरोबर काश्मीरमध्येही काही घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर बुरहानच्या वडिलांनी हे आज आवाहन केले आहे.
त्राल खेरीज शोपियां आणि ट्रेहगाम येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून अन्य ठिकाणीही संचारावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. विद्यापीठांनी आज असलेल्या परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत. दुकानदारांनीही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा व सुरक्षा राखण्यासाठी लष्कराचे तसेच निमलष्करी दलाचे जवान जागोजागी तैनात करण्यात आले आहेत. वानीचं मूळगाव असलेल्या पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्येही संचारबंदी आहे. काश्मिर खोऱ्यामध्ये शांतता रहावी म्हणून खबरदारी घेण्यात येत असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.
कुरापती पाकिस्तान : गोळीबारात एक जवान शहीद, पत्नीचाही झाला मृत्यू
सीमारेषेवर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या कुरापती सुरू झाल्या आहेत. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. नियंत्रण रेषेजवळ पूंछ सेक्टरमध्ये शनिवारी (8 जुलै ) सकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. या हल्ल्यात एक जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर सीमेवर सुरू असलेल्या या गोळीबारात जवानाच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या या कुरापतींना भारतीय लष्कर जशास तसे चोख प्रत्युत्तर देत आहे.