भाजपेतर पक्षांच्या ऐक्याचे आवाहन

By Admin | Published: April 18, 2016 02:41 AM2016-04-18T02:41:15+5:302016-04-18T02:41:15+5:30

पुढच्या लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे लढून काम होणार नाही. भाजपाचा पराभव करायचा असेल, तर देशातील सर्व बिगर भाजपा राजकीय पक्षांना एकत्र यावे लागेल, असे बिहारचे

Appeal for non-BJP parties | भाजपेतर पक्षांच्या ऐक्याचे आवाहन

भाजपेतर पक्षांच्या ऐक्याचे आवाहन

googlenewsNext

पाटणा/नवी दिल्ली : पुढच्या लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे लढून काम होणार नाही. भाजपाचा पराभव करायचा असेल, तर देशातील सर्व बिगर भाजपा राजकीय पक्षांना एकत्र यावे लागेल, असे बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी म्हटले आहे. भाजपामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, असे नमूद करून भाजपाला विरोध असणाऱ्या पक्षांना एकत्र आणण्यात आपली प्रमुख भूमिका राहील, असे स्पष्ट संकेत नितीशकुमार यांनी दिले.
पाटणा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘अ‍ॅडव्हाँटेज कॉन्क्लेव्ह २०१६’मध्ये नितीशकुमार बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. ‘जे लोक भगवा झेंडा फडकवतात तेच आता तिरंग्याबद्दल बोलत आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात रा. स्व. संघाचे काय योगदान आहे? राष्ट्रवाद आणि ‘भारत माता की जय’ यासारख्या घोषणांवरून निरर्थक वाद निर्माण करण्यात येत आहे.
भाजपामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी सर्व बिगर भाजपा पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. वेगवेगळे लढल्यास काम होणार नाही. लोहियांनी बिगर काँग्रेस आघाडी स्थापन केली होती. आता सर्व पक्षांनी भाजपाविरुद्ध एकत्र आले पाहिजे, असे नितीशकुमार म्हणाले.
‘अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या भाजपाच्या तीन दिग्गजांना खड्यासारखे बाजूला फेकण्यात आले आहे आणि धर्मनिरपेक्षता व सांप्रदायिक सौहार्द यावर विश्वास नसलेल्यांच्या हातात सत्ता देण्यात आली आहे,’ अशा शब्दांत नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली.
बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू करण्याचे आपले आश्वासन आपण कसे पाळले आहे, हे सांगताना त्यांनी मोदींवर शरसंधान केले. ते म्हणाले, ‘२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक आश्वासने देण्यात आली होती. काळा पैसा भारतात परत आला काय? गरिबांच्या बँक खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा झाले काय? २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत मी दिलेल्या सात आश्वासनांची लोक थट्टा करत; पण राज्यात संपूर्ण दारूबंदी लागू करून मी पहिले सर्वांत मोठे आश्वासन पूर्ण केले आहे. आता एकेक करून इतर आश्वासनेही पूर्ण करू.’ (वृत्तसंस्था)

भाजपाने उडविली खिल्ली, अंतर्गत भांडणे मिटविण्याचा सल्ला
भाजपा/आरएसएसमुक्त भारत हे नितीशकुमार यांचे दिवास्वप्न आहे. १७ वर्षे भाजपायुक्त राजकारण केलेल्या नितीशकुमार यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही.
भाजपाला पर्याय म्हणून उभे राहण्यापूर्वी आधी संयुक्त जनता दलाला देश पातळीवरील पक्ष करा व आपसातील भांडणे मिटवा, अशा शब्दांत भाजपा नेते शाहनवाज हुसैन यांनी नितीशकुमार यांना प्रतिटोला हाणला.
संजदप्रमुख राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत. हे त्यांचे स्वप्न आहे; पण ते कधीच साकार होणार नाही.
बिहारमध्येच संजदमध्ये ऐक्य नाही. त्यामुळे नितीशकुमार यांनी असे वक्तव्य करण्याआधी संजदची राष्ट्रीय पातळीवर बांधणी केली पाहिजे, असे हुसैन म्हणाले.

२०१९ मध्ये जनताच मोदी सरकारला खाली खेचणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर कोणत्याही आघाडीची गरज पडणार नाही. सध्या नेतृत्वाची चर्चा नाही. तुम्ही काल्पनिक आघाडी निर्माण करीत आहात. परंतु भाजपा आणि आरएसएसमुळे देशाची लोकशाही आणि ऐक्य व अखंडतेला धोका निर्माण झाल्यामुळे देश भाजपामुक्त आणि संघमुक्त केलाच पाहिजे. -शकील अहमद, काँग्रेसचे सरचिटणीस

Web Title: Appeal for non-BJP parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.