‘निर्भया’ खुन्यांच्या नव्या ‘डेथ वॉरंट’साठी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 06:17 AM2020-03-05T06:17:58+5:302020-03-05T06:18:09+5:30
‘निर्भया’ बलात्कार व खून खटल्यात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या मुकेशकुमार सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंग या यारही खुन्यांच्या नव्या ‘डेथ वॉरंट’साठी तिहार कारागृह प्रशासनाने बुधवारी सत्र न्यायालयात अर्ज केला.
नवी दिल्ली : दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार व खून खटल्यात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या मुकेशकुमार सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंग या यारही खुन्यांच्या नव्या ‘डेथ वॉरंट’साठी तिहार कारागृह प्रशासनाने बुधवारी सत्र न्यायालयात अर्ज केला. त्यावर गुरुवारी सुनावणी होईल. नियमानुसार १५ दिवसांनंतरच्या तारखेचे ‘डेथ वॉरंट’ काढता येऊ शकेल.
या चौघांना मंगळवारी ३ मार्च रोजी फाशी द्यायची असे आधी ठरले होते; परंतु पवन गुप्ता याने ऐनवेळी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी त्या दिवशीचे ‘डेथ वॉरंट’ स्थगित केले होते. पवनचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर काही तासांतच फाशीच्या नव्या तारखेसाठी हा अर्ज केला गेला.
पवनचा दयेचा अर्ज हा शेवटचा होता. आता चारही खुन्यांचे कोणत्याही प्रकारचे अर्ज कुठेही प्रलंबित नाहीत. तेव्हा नव्या तारखेचे ‘डेथ वॉरंट’ लगेच जारी करावे, असा आग्रह प्रॉसिक्युटर इरफान अहमद यांनी धरला.
मात्र खुन्यांना नोटीस न देता असे वॉरंट काढणे नैसर्गिक न्यायाला धरून होणार नाही, असे नमूद करून न्यायालयाने चारही खुन्यांना औपचारिक नोटीस काढून गुरुवारी सुनावणी ठेवली.