बाजारभावाप्रमाणे चार आठवड्यांत मावेजा द्या
By Admin | Published: June 19, 2015 02:21 AM2015-06-19T02:21:24+5:302015-06-19T14:10:49+5:30
खंडपीठ : रस्ता रुंदीकरणासाठी संपादित जागेचा मोबदला द्या
खंडपीठ : रस्ता रुंदीकरणासाठी संपादित जागेचा मोबदला द्या
औरंगाबाद : महापालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी जानेवारी २०१२ मध्ये संपादित केलेल्या मालमत्तेचा मावेजा बाजारभावाप्रमाणे चार आठवड्यांत अदा करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांनी दिले.
शहर रस्ता रुंदीकरणात आड येणार्या मालमत्ता संपादित करण्यासाठी महापालिकेने रोशनगेट येथील शेख सांडू ताज मोहम्मद पटेल व महेबूब खान अजीज खान यांचे घर पाडून जागा संपादित केली होती. यासाठी पालिकेने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अवलंबिली नव्हती. या मोबदल्यात शेख सांडू यांना टी.डी.आर. किंवा रोख ९ लाख ९१ हजार ९८० रुपये आणि महेबूब खान यांना २२ लाख ९६ हजार ९७० रुपये घेण्याची सक्ती पालिकेने केली होती. मनपाच्या दंडेलशाही विरुद्ध शेख सांडू व महेबूब खान यांनी ॲड. एस. एस. काझी यांच्यामार्फत खंडपीठात रिट याचिका दाखल केली. यात भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला देण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली होती. ही याचिका सुनावणीसाठी आली असता, मनपातर्फे युक्तिवाद करताना याचिकाकर्त्यांनी २०१३ मध्येही खंडपीठात याचिका केली होती व खंडपीठाने ती फेटाळली होती. याचिकाकर्त्यांनी दिवाणी न्यायालयात दाद मागण्याची सूचना खंडपीठाने केली आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन सदर याचिका फेटाळण्याची विनंती केली होती. भूसंपादन कायद्याच्या तरतुदीप्रमाणे बाजारभावाने याचिकाकर्त्यांना मोबदला देण्याची विनंती ॲड.काजी यांनी याचिकाकर्त्यातर्फे न्यायालयास केली. यावर निकाल देताना याचिकाकर्त्यांनी भूसंपादन अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे मावेजा पास करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा आणि संबंधितांनी चार आठवड्यांत मावेजा द्यावा, असे आदेश दिले.