सात दिवसांत दयेचा अर्ज करा; अन्यथा फास आवळला जाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 04:04 AM2019-11-01T04:04:49+5:302019-11-01T04:05:11+5:30
तिघे तिहारमध्ये, एक मंडावलीत : ‘निर्भया’च्या खुन्यांना तुरुंगाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस
नवी दिल्ली : ‘फाशी टाळण्याचे सर्व कायदेशीर मार्ग संपले असल्याने दयेचा अर्ज करणे हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. त्यानुसार दयेचा अर्ज करायचा असल्यास येत्या सात दिवसांत करा. अन्यथा तुम्हाला फासावर लटकविण्याची पुढील कारवाई केली जाईल’, अशी नोटीस ‘निर्भया’च्या चार खुन्यांना तिहार कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या दिल्लीतील १६ डिसेंबर २०१२ च्या ‘निर्भया’ बलात्कार व खून प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या मुकेश, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंग या चार खुन्यांना २९ आॅक्टोबर रोजी तिहारच्या अधीक्षकांनी ही नोटीस दिली. यापैकी तिघे तिहारमध्ये तर एक मंडावली कारागृहात आहे.
तिहारचे कारागृह महासंचालक संदीप गोयल यांनी सांगितले की, या नोटिशीनुसार या चौघांची इच्छा असल्यास त्यांनी येत्या सात दिवसांत राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करून तसे कळविणे अपेक्षित आहे. तसे न केल्यास न्यायालयाकडून त्यांच्या फाशीचे वॉरन्ट घेण्यासाठी पुढील कारवाई केली जाईल.
महिला आयोगाने विचारला होता जाब
सर्वोच्च न्यायालयानेही फेरविचार अर्ज फेटाळून एक वर्ष उलटले असल्याने खुन्यांना लगेच फाशी दिले जावे यासाठी निर्भयाच्या आईने केलेल्या अर्जांवर न्यायालयाने व दिल्ली महिला आयोगाने अलीकडेच तुरुंग प्रशासनास जाब विचारला होता. या चौघांखेरीज फाशी झालेल्या रामसिंग नावाच्या आणखी एका खुन्याने आत्महत्या केली होती. आणखी एक आरोपी अल्पवयीन होता. बालगुन्हेगार म्हणून झालेली तीन वर्षांची शिक्षा भोगून तो चार वर्षांपूर्वीच सुटला आहे.