पासपोर्टसाठी अर्ज करा आता हिंदी भाषेतून !
By admin | Published: April 23, 2017 06:57 PM2017-04-23T18:57:14+5:302017-04-23T18:57:14+5:30
नुकत्याच जारी केलेल्या एका तरतुदीनुसार पासपोर्टसाठी आता हिंदी भाषेतूनही अर्ज करता येणार आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - देशाबाहेर प्रवासादरम्यान आवश्यक पुराव्यांपैकी महत्त्वाचा पुरावा हा पासपोर्ट आहे. पासपोर्ट असल्यावरच तुम्हाला देशाबाहेर प्रवास करणं शक्य होणार आहे. विशेष म्हणजे पासपोर्टसाठी (पारपत्र) आता ऑनलाइन पद्धतीनंही अर्ज करता येतो. त्यामुळे अवघ्या 10 दिवसांत अर्जदाराला त्याचा पासपोर्ट मिळवता येणार आहे. डॉक्युमेंट्ससाठी तुम्हाला धावपळही करावी लागणार नाही. पासपोर्टसाठी अर्ज करणा-या अर्जदाराला स्वतःचे डॉक्युमेंट्स ऑनलाइन पद्धतीनं देता येणार आहेत. तसेच ओळखपत्र आणि रहिवास दाखल्याच्या जागेवर फक्त एका आधार कार्डवर तुम्हाला पासपोर्ट मिळवता येणार आहे. त्याप्रमाणेच इंग्रजी भाषेचं ज्ञान नसलेल्या लोकांसाठी एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या एका तरतुदीनुसार पासपोर्टसाठी आता हिंदी भाषेतूनही अर्ज करता येणार आहे. संसदीय समितीच्या नवव्या अहवालातील अधिकृत भाषे संबंधातील शिफारशी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला आहे. या समितीने 2011 साली हा अहवाल सरकारला दिला होता. पासपोर्ट कार्यालयात हिंदी आणि इंग्रजी या दोन्हीही भाषांमध्ये अर्ज उपलब्ध असावा, अशी शिफारस समितीकडून करण्यात आली होती. संसदीय समितीनं हिंदीत भरलेले अर्ज स्वीकारले जाऊन पासपोर्टवरील सर्व नोंदी हिंदीत असण्याची अट घातली होती, त्याप्रमाणेच पासपोर्ट आणि व्हिसासंबंधित माहितीही परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर हिंदीत टाकण्यात यावी, असंही समितीनं सूचवलं होतं. तसेच पासपोर्ट कार्यालयात हिंदीतून काम करण्याची परवानगी देण्यासोबतच पासपोर्ट कार्यालय आणि दूतावासात हिंदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची समितीची अट होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदीय समितीच्या या सर्व शिफारशींना मंजुरी दिली असून, तुम्हाला आता हिंदीतील अर्ज डाऊनलोड करता येणार आहेत.
तसेच ते हिंदीतून भरून जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पासपोर्ट सेवा केंद्र आणि क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयात भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट मात्र स्वीकारली जाणार नसल्याचंही परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टसाठी आधार कार्डही जन्मदाखल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल, असा अध्यादेश काढला होता. या निर्णयामुळेही पासपोर्ट प्रक्रिया सोपी होण्यास मदत झाली आहे. पासपोर्ट अधिनियम 1980 नुसार 26 जानेवारी 1989 या दिवशी किंवा त्यानंतर ज्यांचा जन्म झालाय, त्यांना पासपोर्टसाठी जन्म दाखला सादर करणं सक्तीचे होते. मात्र, सुधारित नियमांनुसार आता परराष्ट्र खात्याने आणखी काही पर्याय दिले असून, जन्म दाखल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.