पंजाबात राष्ट्रपती राजवट लागू करा
By admin | Published: May 5, 2015 11:44 PM2015-05-05T23:44:40+5:302015-05-06T00:43:54+5:30
पंजाबच्या मोगा येथे मुलीचा विनयभंग करून तिला धावत्या बसमधून फेकून दिल्याच्या घटनेचे मंगळवारी संसदेत तीव्र पडसाद उमटले
नवी दिल्ली : पंजाबच्या मोगा येथे मुलीचा विनयभंग करून तिला धावत्या बसमधून फेकून दिल्याच्या घटनेचे मंगळवारी संसदेत तीव्र पडसाद उमटले. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी हे प्रकरण लावून धरत, पंजाबात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.
लोकसभेत काँग्रेसचे अमरिंदर सिंग यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. मोगामध्ये विनयभंग केल्यानंतर मुलीला धावत्या बसमधून फेकून देण्यात आले. गत सोमवारी घडलेल्या या घटनेमध्ये पीडित मुलीचा मृत्यू झाला होता. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या बसमध्ये हा प्रकार घडल्याने काँग्रेससह विरोधक या मुद्यावर आक्रमक झाले. राज्यसभेत संसदीय कामकाजमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी हा राज्याचा मुद्दा असल्याचे सांगून तो संसदेत उपस्थित करण्यास विरोध दर्शवला; मात्र याउपरही काँग्रेस सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
> राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णत: ढासळली आहे. एकापेक्षा एक गंभीर गुन्हे घडत आहेत व सरकार हातावर हात ठेवून गप्प बसले आहे. अशा स्थितीत पंजाब सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी अमरिंदर सिंग यांनी केली.