राममंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी मोहन भागवत यांना नियुक्त करा; मागणीसाठी अयोध्येत उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 10:07 AM2020-02-07T10:07:15+5:302020-02-07T10:08:26+5:30
आरएसएसची विचारधारा राष्ट्रवादी आहे. त्यामुळे संघप्रमुखांचा सन्मान व्हायला हवा. आताचे अध्यक्ष परासरन चांगले व्यक्ती आहे. मात्र ट्रस्टच्या अध्यक्षपदी भागवतच पाहिजे, असंही दास यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या वतीने आयोध्येतील राम मंदिर ट्रस्टची स्थापन करण्यात आली असून यावर सदस्य आणि अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या नियुक्त्यावरून आता नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या विरोधात आंदोलनही सुरू करण्यात आले आहे. 15 सदस्यीय ट्रस्टच्या अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला असून सरसंघचालक मोहन भागवत यांना अध्यक्षपदी नियुक्त करण्याची मागणी होत आहे. यासाठी आयोध्येतील संतांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
केंद्र सरकारने गठीत केलेल्या 15 सदस्यीय समितीत 9 सदस्य स्थायी आणि सहा सदस्य नियुक्त केलेले असणार आहे. या ट्रस्टच्या अध्यक्षपदी के. परासरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या तपस्वी छावणीचे संत महंत परमहंस दास यांनी उपोषण सुरू केले आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना अध्यक्षपदी विराजमान करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बिलारीडीह येथे दास यांनी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत भागवत यांना ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात येत नाही, तोपर्यंत आपण उपोषण करणार असल्याचे दास यांचे म्हणणे आहे. आरएसएसची विचारधारा राष्ट्रवादी आहे. त्यामुळे संघप्रमुखांचा सन्मान व्हायला हवा. आताचे अध्यक्ष परासरन चांगले व्यक्ती आहे. मात्र ट्रस्टच्या अध्यक्षपदी भागवतच पाहिजे, असंही दास यांनी म्हटले आहे.