राष्ट्रपती भवनात शाबासकी मिळवणारे 'शाही शेफ' आता पार्लमेंट कँटिनची चव वाढवणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 09:26 PM2020-10-29T21:26:11+5:302020-10-29T21:57:07+5:30
Chef Montu Saini : जून २०१५ मध्ये राष्ट्रपती भवन येथे त्यांची एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून नेमणूक झाली होती.
- सीताराम मेवाती
मुंबई : सेलिब्रिटी शेफ मोंटू सैनी यांची संसदेतील कँटिनच्या एक्झिक्युटिव्ह शेफ या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी शेफ सैनी हे भारताचे राष्ट्रपती यांचे शासकीय निवासस्थान 'राष्ट्रपती भवन' येथे पाच वर्षे एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून कार्यरत होते. त्यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि रामनाथ कोविंद यांना आपले चविष्ट पदार्थ वाढून शाबासकी घेतली आहे.
शेफ सैनी यांचा राष्ट्रपती भवन येथील पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते आपल्या मुख्य कार्यालय भारत पर्यटन विकास निगमचे (आयटीडीसी) नवी दिल्ली येथील पंचतारांकित अशोक हॉटेलमध्ये रूजू झाले होते. मात्र, शेफ सैनी यांची राष्ट्रपती भवन येथील लोकप्रियता पाहून संसद कँटिनमध्ये नेमणूक करण्यात आली आहे.
गेली अनेक वर्षे संसदेचे कँटिन उत्तर रेल्वेकडून चालविण्यात येत होते. मात्र, आता १५ नोव्हेंबरपासून संसदेचे कँटिन चालविण्याची जवाबदारी आयटीडीसीला देण्यात आली आहे. आयटीडीसी हे लक्झरी फाइव्ह-स्टार अशोक ग्रुप ऑफ हॉटेल आहे. आयटीडीसी १५ नोव्हेंबरपासून सुमारे १२५-१५० कर्मचाऱ्यांसह आपले काम सुरू करेल. मात्र सध्या कोविड-१९ मुळे कँटिन आता चहा, कॉफी आणि पॅकेज केलेल्या स्नॅक्ससाठीच मर्यादित राहील.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आयटीडीसी संसदेत पंचतारांकित हॉटेलच्या गुणवत्तेशी जुळण्यासाठी स्वयंपाकघर सुधारण्याचा विचार करीत आहे. आम्हाला सध्या थांबावे लागेल कारण हे सर्व निर्णय विविध सचिवालयांच्या परवानगी प्रमाणे मंजूर करण्यात येतात. संपूर्ण सचिवालय काय मंजूर करते. ते पहावे लागेल. परंतु आम्ही त्यांना विविध प्रकारचे चहा, कॉफी, कॅपुचिनो, डिकॅफे इत्यादी देऊ इच्छितो.
शेफ मोंटू सैनी यांचा आतापर्यंतचा प्रवास
हरियाणा येथे जन्माला आलेले शेफ मोंटू सैनी यांचे वय ३८ वर्षे असून त्यांनी आयएचएम बंगलोर येथून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. शेफ सैनी यांनी आपल्या नोकरीची सुरुवात पिझ्झा हट येथून सुरु केली व त्या नंतर ऑबेरॉय हॉटेलमध्ये नोकरीला लागले. अशोका हॉटेलमध्ये त्यांची मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी आपली नवीन इंनिंग सुरु केली. जून २०१५ मध्ये राष्ट्रपती भवन येथे त्यांची एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून नेमणूक झाली होती.
शेफ सैनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती यांचे कुटुंब समवेत शाही राज्य मेजवानी स्वयंपाकघर ब्रिगेडचे प्रमुख होते. आपल्या राष्ट्रपती भवनाच्या कार्यकाळात कार्यकारी शेफपदाची भूमिका असल्याने त्यांनी जगातील काही प्रमुख राष्ट्राध्यक्षांच्या शाही मेजवानी आयोजनाचे संचालन केले. त्यात प्रामुख्याने फ्रेंच प्रजासत्ताक, अबू धाबी, टांझानिया, मोझांबिक गणराज्य, म्यानमार, इजिप्त प्रजासत्ताक, इस्त्राईल, इंडोनेशिया रिपब्लिक सारख्या देशांचे समावेश आहे.