Twitter : ट्विटरकडून विनय प्रकाश यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 11:52 AM2021-07-11T11:52:56+5:302021-07-11T11:53:13+5:30
Twitter : RGO ची नेमणूक करण्याबरोबरच कंपनीने 26 मे 2021 ते 25 जून 2021 या कालावधीतील कंप्लायंस रिपोर्टही प्रकाशित केला आहे.
नवी दिल्ली : मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने (Twitter) विनय प्रकाश (Vinay Prakash) यांची भारतात तक्रार निवारण अधिकारी (RGO) म्हणून नियुक्ती केली आहे. यासह ट्विटरने भारतात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याचा स्थानिक पत्ताही दिला आहे. जर कोणाला संपर्क करायचे असेल तर ते भेटू देखिल शकतात. (twitter appoints vinay prakash as its resident grievance officer)
ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, विनय प्रकाश यांचा ईमेल आयडी grievance-officer-in@twitter.com आहे. तसेच, त्यांचे कार्यालय कर्नाटकच्या बंगळुरू येथील स्टेट बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर आहे. ट्विटरने म्हटले आहे की, ट्विटरला भारतात 'चौथा मजला, द इस्टेट, 121 डिकेंसन रोड, बंगळुरू 560042' येथे संपर्क साधला जाऊ शकतो. ही माहिती कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे.
दरम्यान, अलीकडेच माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरच्या नवीन माहिती तंत्रज्ञानाविषयी (आयटी) नियमांबद्दल केंद्र सरकारकडे केलेल्या अडचणीवर म्हटले होते की, जे लोक भारतात राहतात आणि काम करतात त्यांना देशाच्या नियमांचे पालन करावे लागेल.
कंप्लायंस रिपोर्टही प्रकाशित
RGO ची नेमणूक करण्याबरोबरच कंपनीने 26 मे 2021 ते 25 जून 2021 या कालावधीतील कंप्लायंस रिपोर्टही प्रकाशित केला आहे. आयटी नियमांनुसार, हा आणखी एक महत्त्वाचा नियम होता जो 26 मे रोजी अस्तित्वात आला. यापूर्वी ट्विटरने धर्मेंद्र चतूर यांना आपला अंतरिम अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. मात्र, धर्मेंद्र चतुर यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिला होता.
दरम्यान, सोशल मीडियाच्या नवीन नियमांबाबत भारत सरकार आणि ट्विटर यांच्यात संघर्ष सुरु आहे. 8 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, आयटीच्या नव्या नियमांबाबत केंद्र सरकारकडे अडचणीचा सामना करत असलेल्या ट्विटरने कोर्टाला सांगितले की, त्याने अंतरिम मुख्य अनुपालन अधिकारी नेमले आहेत, जे भारताचे रहिवासी आहेत.
याचबरोबर, ट्विटर नियमांनुसार आठ आठवड्यांत या पदासाठी नियमित अधिकारी नेमण्याचा प्रयत्न करतील. यासंदर्भात कोर्टाने मायक्रोब्लॉगिंग साइटला नवीन नियमांचे पालन केल्याबद्दल अमेरिकेतील नोटरीने सत्यापित असलेले प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास दोन आठवड्यांचा कालावधी दिला.