‘सुप्रीम’च्या आदेशानंतरच नियुक्ती
By admin | Published: December 28, 2015 12:20 AM2015-12-28T00:20:12+5:302015-12-28T00:20:12+5:30
केंद्रीय माहिती आयोगात तीन माहिती आयुक्तांच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आयोगात तीन माहिती आयुक्तांच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या (डीओपीटी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी यासंदर्भात माहिती दिली. ४ जानेवारीला संबंधित याचिकेवर सुनावणी होणार आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागणाऱ्या लोकांच्या तक्रारी व अपिलांवर सुनावणी करणाऱ्या केंद्रीय माहिती आयोगात एक मुख्य आयुक्त आणि दहा माहिती आयुक्त असतात. सध्या वसंत सेठ, यशोवर्धन आझाद, शरत सभरवाल, मंजूला पराशर, एम.ए. खान युसुफी, मदभूषणम श्रीधर आचार्युलू आणि सुधीर भार्गव असे सात माहिती आयुक्त कार्यरत आहेत. अन्य तीन पदे रिक्त आहेत. डीओपीटीने २०१४ मध्ये मुख्य माहिती आयुक्त व आयुक्तांची पदे भरण्यासाठी अर्ज मागवले होते. आलेल्या अर्जांमधून सर्व पदे भरण्याऐवजी डीओपीटीने सप्टेंबरमध्ये पुन्हा अर्ज मागवले. गत १६ डिसेंबरला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील नियुक्ती समितीने माजी संरक्षण सचिव आर.के. माथुर यांना मुख्य माहिती आयुक्तपदी नेमले. ज्येष्ठता प्राधान्यक्रमानुसार मुख्य माहिती आयुक्त नेमण्याची परंपरा मोडत ही नियुक्ती केली गेली. तत्पूर्वी ६ नोव्हेंबरला उच्च न्यायालयाने गतवर्षीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने आलेल्या ५५३ अर्जदारांमधून मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्तांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. डीओपीटीने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.