प्रशंसा गडकरींची, संकट सभापती धनखड यांच्यापुढे; मंत्रालयाशी संबंधित पुरवणी प्रश्नावरून ‘व्यथा’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 08:45 AM2023-08-03T08:45:37+5:302023-08-03T08:48:33+5:30
ही प्रशंसा केवळ भारतापुरती मर्यादित नाही. आपण तीनवेळा परदेशी गेलो, तिथला अनुभव आपण सांगू शकतो, असे सभापती धनखड म्हणाले. गडकरी यांची प्रशंसा तर भरपूर झाली. पण, त्यांनी माझ्यापुढे संकट उभे केले आहे.
सुनील चावके -
नवी दिल्ली : केंद्रीय राष्ट्रीय राजमार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाची बुधवारी प्रश्नोत्तरांच्या तासात राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांच्यासह सदस्यांनी बाके वाजवून प्रशंसा केली. गडकरींची प्रशंसा केवळ भारतापुरतीच मर्यादित नसून ती परदेशातही ऐकायला मिळते, अशी प्रशस्ती सभापती धनखड यांनी दिली. गडकरींच्या मंत्रालयाशी संबंधित इतके पुरवणी प्रश्न येतात की, आपल्यापुढेही संकट उभे ठाकते, अशी ‘व्यथा’ही धनकड यांनी बोलून दाखवली.
ही प्रशंसा केवळ भारतापुरती मर्यादित नाही. आपण तीनवेळा परदेशी गेलो, तिथला अनुभव आपण सांगू शकतो, असे सभापती धनखड म्हणाले. गडकरी यांची प्रशंसा तर भरपूर झाली. पण, त्यांनी माझ्यापुढे संकट उभे केले आहे.
त्यांच्या मंत्रालयाशी संबंधित इतके पुरवणी प्रश्न आले आहेत, की मला पुरवणी प्रश्नांची मर्यादा वाढवूनही अनेक प्रश्न शेवटी मागे ठेवावे लागले. सदस्यांच्या पुरवणी प्रश्नांविषयीच्या विनंत्यांचा आपण पुढच्या वेळी अधिक सक्रियतेने विचार करू, असे सभापती धनकड म्हणाले.
मुंबई ते गोवा प्रकल्पावर पुस्तक लिहिता येईल
सिधी - सिंगरौलीच्या दीर्घकाळापासून रखडलेल्या रस्त्याची समस्या सुटली नसल्यामुळे त्याविषयीच्या प्रश्नाचे उत्तर देताना मनात अपराधभाव निर्माण होतो. देशात मुंबई ते गोवा आणि सिधी - सिंगरौलीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांवर पुस्तक लिहिले जाऊ शकते. या दोन्ही प्रकल्पांमध्ये इतक्या कायदेशीर अडचणी आल्या की, त्यामुळे प्रकल्पांचे काम पूर्णत्त्वाला जाऊ शकले नाही आणि जनतेला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब दुर्भाग्यपूर्ण आहे, याशिवाय आपल्यापाशी कोणतेही उत्तर नाही, असे गडकरी म्हणाले.
५९ हजार ७२२ कोटींचे गतिशक्ती प्रकल्प
पंतप्रधान मोदी यांनी २०२०-२१ मध्ये केलेल्या पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात ३३९४ कि. मी. लांबीच्या ५९ हजार ७२२ कोटींच्या १४६ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पांवर आतापर्यंत ३७ हजार ७८३ कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.