दारिद्र्य निर्मूलनासाठी महत्त्वाकांक्षी योजना मंजूर
By admin | Published: September 26, 2015 09:58 PM2015-09-26T21:58:22+5:302015-09-26T21:58:22+5:30
येत्या १५ वर्षांत जगातून गरिबी उच्चाटन करून विषमता दूर करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेस संयुक्त राष्ट्रांच्या सर्व १९३ सदस्य देशांनी मान्यता दिली आहे
संयुक्त राष्ट्रे : येत्या १५ वर्षांत जगातून गरिबी उच्चाटन करून विषमता दूर करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेस संयुक्त राष्ट्रांच्या सर्व १९३ सदस्य देशांनी मान्यता दिली आहे. त्याचबरोबर ‘टिकाऊ विकासा’संबंधी (सस्टेनेबल डेव्हलपमेंट) संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेची सांगता झाली.
‘टिकाऊ विकास’ योजनेतहत आगामी १५ वर्षांत भूक आणि दारिद्र्य समाप्त करावयाचे आहे. त्याचबरोबर स्त्री-पुरुष असा भेदाभेद न करता सर्वांना सन्मानित जीवन जगण्याची संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या ऐतिहासिक वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील सर्व नेते उपस्थित होते.
१९३ सदस्यीय महासभेने ‘आपल्या जगात बदल : टिकाऊ विकासासाठी २०३० ची कार्यक्रमपत्रिका’ हा प्रस्ताव मंजूर केला. या प्रस्तावातच पुढील १५ वर्षांत ‘दारिद्र्याचे पूर्णपणे उच्चाटन, विषमता आणि हवामानातील बदल’ या मुद्यावर ‘१७ उद्दिष्टे’ आणि ‘१६९ लक्ष्य’ निश्चित केले आहेत.
अनेक वर्षे आणि महिने सखोल चर्चा करून ही नवीन कार्यक्रमपत्रिका मंजूर करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या ७० व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित महासभेसाठी जागतिक वित्तीय संस्थांचे प्रमुख आणि अन्य ज्येष्ठ नेते संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आले असताना या महत्त्वाकांक्षी योजनेला मान्यता देण्यात आली.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी या कार्यक्रमपत्रिकेला ‘बिगुल’ या शब्दात संबोधले. ते म्हणाले की, हीच कार्यक्रमपत्रिका सर्वांना समान जीवन जगण्याची, समृद्धीची, शांतीची, सशक्त करणाची संधी देणार आहे. सध्याची पिढी आणि भावी पिढी यांना ही कार्यक्रमपत्रिका फायद्याची ठरेल. (वृत्तसंस्था)
1 आगामी १५ वर्षांत संयुक्त राष्ट्रांनी जी १७ उद्दिष्टे निश्चित केली आहेत, त्यात दारिद्र्याचे संपूर्णपणे निर्मूलन, भूक पूर्णपणे दूर करणे, उच्च शिक्षण, समानता, स्थिर शहर आणि समाज, तसेच स्वच्छ पाणी आणि साफसफाई यांचा समावेश आहे.
2 २०१५ हे वर्ष संयुक्त राष्ट्रांसाठी ऐतिहासिक ठरेल, असा अधिकाऱ्यांचा कयास आहे. यातून कोणताही देश विकासापासून दूर राहणार नाही आणि विकासाची व्याख्याच बदलेल, असे या अधिकाऱ्यांना वाटते.
3 त्यातून याच वर्षी जागतिक हवामान बदलविषयक कराराला प्रोत्साहन मिळेल. अमेरिकेत प्रथमच आलेले पोप फ्रान्सिस यांनी महासभेत ऐतिहासिक भाषण केले.