लेह-श्रीनगर केवळ 15 मिनिटांत, आशियातील सर्वात मोठ्या बोगद्याला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 09:45 PM2018-01-03T21:45:47+5:302018-01-03T21:50:15+5:30
आशियातील दोन्ही बाजूंनी कार्यरत राहू शकणारा सर्वात मोठा 'झोजी ला' खिंड बोगदा बांधण्यास केंद्र सरकारच्या कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली- आशियातील दोन्ही बाजूंनी कार्यरत राहू शकणारा सर्वात मोठा 'झोजी ला' खिंड बोगदा बांधण्यास केंद्र सरकारच्या कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. या बोगद्याला ६,०८९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे श्रीनगर व लेह या प्रवासासाठी लागणारा वेळ साडेतीन तासांवरून १५ मिनिटांवर येणार आहे.
हा बोगदा १४.२ किमी लांबीचा असून त्याच्यामुळे श्रीनगर, कारगिल, लेह यांच्यातील वाहतूक वर्षभर अखंड राहणार आहे. अन्यथा हिवाळ्यात बर्फवृष्टीनंतर त्यांच्यामधील संपर्क तुटतो. या समस्येवर हा बोगदा उत्तम तोडगा होऊ शकतो. पंतप्रधान नेतृत्व करत असलेल्या आर्थिक विषयक कॅबिनेट समितीने या बोगद्याच्या कामाला आज हिरवा कंदील दाखवला.
Main objective of the project is to provide all weather connectivity to strategically important Leh region in the state of J&K. With projects like 6.5 km long Z-Morh tunnel at Gagangir wud ensure safe,fast&cost effective connectivity between the 2 regions of Kashmir & Ladakh 2/3
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 3, 2018
यावर बोलताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, "हा बोगदा दोन्ही बाजूंनी कार्यरत राहू शकणारा आशियातील सर्वात मोठा बोगदा असेल. त्याच्या निर्मितीसाठी ७ वर्षांचा कालावधी लागेल. अत्यंत खडतर भूपृष्ठ रचना व जेथे पारा शून्याच्या खाली ४५ अंश घसरतो तेथे बांधण्यात येणारा हा बोगदा अभियांत्रिकी क्षेत्रातील आश्चर्यच असेल, त्याचे काम यावर्षीच सुरू करण्यात येईल. या बोगद्यामुळे श्रीनगर आणि लेह यांच्यामधील प्रवासाचे अंतर १५ मिनिटांवर येईल.'' 'झोजी ला ' समुद्रसपाटीपासून ११,५८७ फूट उंचीवर आहे. तसेच ती श्रीनगर- कारगिल-लेह महामार्गावर असून, बर्फवृष्टी आणि दरड कोसळण्याने हिवाळ्यात येथील वाहतूक खंडित होते.