हवाई दलात महिला फायर पायलट समावेशास संरक्षण मंत्रालयाची मंजुरी
By admin | Published: October 24, 2015 05:00 PM2015-10-24T17:00:00+5:302015-10-24T17:05:52+5:30
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाई दलाच्या लढाऊ पथकात महिलांचा समावेश करण्याच्या प्रस्तावास मंजूरी दिल्याने आता हवाई दलातील महिला वैमानिकांचा लढाऊ विमाने चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाई दलाच्या लढाऊ पथकात महिलांचा समावेश करण्याच्या प्रस्तावास मंजूरी दिल्याने आता हवाई दलातील महिला वैमानिकांचा लढाऊ विमाने चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हवाई दल प्रबोधिनी येथे विमान उड्डाणाचे प्रशिक्षण घेणा-या बॅचमधून लढाऊ विमान चालवण्यासाठी महिला वैमानिकांची पहिली तुकडी निवडली जाणार आहे. त्यानंतर एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण घेऊन २०१७ साली महिला वैमानिकांची पहिली तुकडी लढाऊ विमान चालवण्यास सज्ज होईल.
या महिन्याच्या सुरूवातीस हवाई दलाच्या ८३ व्या वर्धापनदिन कार्यक्रमादरम्यान हवाई दल प्रमुख अरुप राहा यांनी महिला वैमानिकांकडे लढाऊ विमानांची जबाबदारी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले होते. अखेर या प्रस्तावास मंजूरी मिळाल्याचे आज संरक्षण मंत्रालयातर्फे घोषित करण्यात आले. भारतीय हवाई दलातील महिला वैमानिक सध्या माल वाहतूक विमाने व हॅलिकॉप्टर चालवतात आणि आता त्यांचा लढाऊ विमाने चालवण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.