आठ हायस्पीड प्रकल्पांना मंजुरी; ३० किमी लांबीच्या नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 08:50 AM2024-08-03T08:50:20+5:302024-08-03T08:50:31+5:30
आठ मार्गिकांचा असलेला नाशिक फाटा-खेड हा हायस्पीड कॉरिडॉर बांधा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वानुसार साकारण्यात येणार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशभरात आठ हायस्पीड रोड कॉरिडॉर प्रॉजेक्टना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यांची लांबी ९३६ किमी असून, त्यांच्या बांधणीसाठी ५० हजार ६५५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामध्ये आठ मार्गिकांचा व ३० किमी लांबीचा इलेव्हेटेड नाशिक फाटा-खेड कॉरिडॉर या प्रकल्पाचा समावेश आहे.
आठ मार्गिकांचा असलेला नाशिक फाटा-खेड हा हायस्पीड कॉरिडॉर बांधा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वानुसार साकारण्यात येणार असून, त्यासाठी ७,८२७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग-६०वर पुणे व नाशिकमध्ये हा इलेव्हेटेड कॉरिडॉर चाकण, भोसरी इत्यादी ठिकाणांहून येणाऱ्या किंवा तिथे जाणाऱ्या वाहनांसाठी सुखकर मार्ग होणार आहे. पिंपरी-चिंचवड येथे होणारी वाहतूक कोंडीदेखील या कॉरिडॉरमुळे कमी होण्यास मदत होणार आहे. नाशिक फाटा ते खेड या दोन्ही बाजूंच्या दोन लेन सर्व्हिस रोडसह विद्यमान रस्त्याचे ४/६ लेनमध्ये रूपांतरित करण्यात येईल.
विकासाला मिळेल चालना : पंतप्रधान
आठ हायस्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना दिलेली मंजुरी ही भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना व महत्त्वाचे परिवर्तन करणारी ठरणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आर्थिक विकास वेगाने होईल, रोजगाराच्या संधी वाढतील, असेही मोदी म्हणाले.
महाराष्ट्राला आणखी एक भेट : फडणवीस
या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर होणार आहेच, पण या विभागातील औद्योगिक विकासालाही वेगाने चालना मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत विकासासाठी दिलेली आणखी एक भेट आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.