यमुनोत्री रोपवेला मंजुरी : प्रवासाचा वेळ १० मिनिटांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 10:14 AM2023-02-16T10:14:38+5:302023-02-16T10:15:11+5:30
महत्त्वाकांक्षी प्रकल्प : उन्हाळ्यात काम सुरु होण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
उत्तर काशी : यमुनोत्री तीर्थक्षेत्र खरसाळी गावाला जोडणाऱ्या प्रकल्पाच्या विकासासाठी सरकार लवकरच ३.८ हेक्टर जमीन हस्तांतरित करणार आहे. ३.७ कि.मी. लांबीच्या (हवाई अंतर) रोपवेमुळे प्रवासाचा वेळ पाच तासांवरून फक्त १० मिनिटांवर येणार आहे.
पर्यावरण आणि वन मंत्रालयाने या प्रकल्पाचा हिरवा झेंडा दाखविला असून तो आता मार्गी लागणार आहे. पर्यटन विभागाचे अधिकारी राहुल चौबे यांनी सांगितले की, प्रकल्पाचे काम या उन्हाळ्यात सुरू होईल आणि दोन वर्षांत पूर्ण होईल. यात्रेकरूंना विशेषत: वृद्धांना पर्वताच्या शिखरावर जाण्यासाठी पाच कि.मी. लांबीचा मार्ग टाळता येणार आहे. याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुरत रावल म्हणाले की, रोपवेसाठी २००६ पासून प्रयत्न सुरू आहेत. खरसाळी गावातील स्थानिकांनीही या प्रकल्पासाठी पर्यटन विभागाकडे १.५ हेक्टर जागा उपलब्ध करून दिली आहे.
खडतर मार्ग होणार सोपा
यात्रेकरू आणि पुजारी यांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी जानकीचट्टीपासून सुरू होणाऱ्या ५ कि.मी.च्या खडतर मार्गावरून जावे लागते. वृद्ध व्यक्ती आणि आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांना या मार्गावरून प्रवास करणे अवघड जाते. रोपवेमुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळणार नाही; तर प्रवासाचा वेळही कमी होणार आहे. गतवर्षी यमुनोत्री तीर्थयात्रेदरम्यान तब्बल ८१ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. रोपवेची मागणी पूर्ण होत असल्याने मंदिराचे पुजारी, यात्रेकरूंमधून समाधान व्यक्त केले जात आहे.