५० हजार कोटींच्या प्रगत युद्धसाहित्य खरेदीस मंजुरी; लढाऊ विमानांसह क्षेपणास्त्रांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 04:27 AM2020-07-03T04:27:28+5:302020-07-03T07:10:35+5:30
चीनच्या कुरापतींनंतर सीमेवर सुखोई व मिग लढाऊ विमाने तसेच अॅपाचे व चिनूक लडाऊ हेलिकॉप्टर तैनात करून दक्षता वाढविली आहे. शिवाय चीनच्या हवाई क्षमतेस उत्तर देण्यासाठी अत्याधुनिक विमानविरोधी यंत्रणाही तेथे सज्ज करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : पूर्व सीमेवर चीनने सुरू केलेल्या कुरापतींना चोख उत्तर देण्याच्या सैन्यदलांच्या क्षमतेस अधिक बळकटी देण्यासाठी अत्याधुनिक लढाऊ विमाने व प्रभावी क्षेपणस्त्रांसह ५० हजार कोटींच नवे युद्धसाहित्य खरेदी करण्यास संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी मंजुरी दिली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखालील ‘डिफेन्स अॅक्विझिशन कौन्सिल’ने तिन्ही सैन्यदलांनी सादर केलेल्या विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यापैकी सर्वात मोठ्या म्हणजे १८, १४८ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव हवाई दलासाठी आहे. त्यानुसार ‘एसयू३० एमकेआय’ प्रकारची १२ व ‘मिग-२९’ प्रकारची २१ नवी विमाने खरेदी केली जातील. सध्या ताफ्यात असलेल्या ‘मिग-२१’ प्रकारच्या ५९ विमानांचीही श्रेणीवाढ केली जाईल. नवी ‘मिग-२९’ विमानांची खरेदी व जुन्या विमानांची श्रेणीवाढ रशियाकडून करून घेतली जाईल. त्याला ७,४१८ कोटी रुपये खर्च येईल. नवी ‘एसयू३० एमकेआय’ लढाऊ विमाने हिंदुस्तान एअरोनॉटिक्स(एचएएल) या सरकारी कंपनीकडून १०,७३० कोटी रुपयांना गेतली जातील. नव्या लढाऊ विमानांमुळे अधिक स्वाड्र्न तयार करून हवाईदलाची मारकक्षमता अधिक विस्तारेल व बळकट होईल.
याखेरीज आणखी ३८,९०० कोटी रुपये खर्च करून तिन्ही सैन्यदलांसाठी आणखी विविध प्रकारची शस्त्रे व युद्धसामुग्री खरेदी केली जाईल. यात हवाईदल व नौदलासाठी घेतली जाणारी नजरेच्या पट्ट्यापलिकडे अचूक मारा करू शकणारी २४८ ‘अॅस्ट्रा’ व ‘पिनाका’ क्षेपणास्त्रे विशेष महत्त्वाची आहेत. शिवाय एक हजार किमी पल्ल्याची जमिनीवरून मारा करणारी क्रुझ क्षेपणास्त्रे विकसित करण्यासही संरक्षण संशोधन व विकास संघटनेस (डीआरडीओ) संमती देण्यात आली. नव्या ‘पिनाका’ क्षेपणास्त्रांमुळे लष्कराच्या नव्या रेजिमेंट बांधता येतील तर एक हाजर किमी पल्ल्याच्या क्रुझ क्षेपणास्त्रांच्या सज्जतेने नौदल व हवाईदल अधिक बलशाली होईल. ‘अॅस्ट्रा’ क्षेपणास्त्रे नौदल व हवाईदलास नवे बळ देतील.